कोल्हापूर : शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. आता बरनाला (पंजाब) जिल्ह्याला मागे टाकत देशात प्रथम येण्याचा संकल्प करा, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या जिल्हा शिक्षक पुरस्कार तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते सोमवारी महासैनिक दरबार हॉलमध्ये झाले. याप्रसंगी ते बोलत होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. पुढील वर्षीपासून शिक्षक पुरस्कार दि. 5 सप्टेंबर शिक्षकदिनीच वितरित होतील. ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाने शिक्षण क्षेत्रात लोकचळवळ उभारली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. अशोकराव माने यांनी, जिल्हा परिषद शाळांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाल्यामुळे विद्यार्थी, पालक या शाळांकडे वळत आहेत ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे यांचेही भाषण झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी ई-जीपीएफ संगणक प्रणालीचे अनावरण व राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या रवींद्र केदार व दत्तात्रय घुगरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसाद खोबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, उपशिक्षणाधिकारी रत्नप्रभा दबडे व रामचंद्र कांबळे, अधीक्षक रवींद्र ठोकळ यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप मगदूम आणि सविता कुंभार यांनी केले.
मारुती देवेकर, कीर्ती पाटील, वैशाली भोईटे, छाया चौगुले, बंडोपंत पाटील, राजमोहन पाटील, आनंदा पाटील, ऊर्मिला तेली, अर्चना म्हागोरे, भानुदास सुतार, महम्मद मुजावर, बाजीराव जाधव, गणपती कुंभार, उमाताई लोणारकर, मारुती डवरी, संजय गुरव, रंजिता देसूरकर, सतीश तेली, क्रांतिसिंह सावंत, मारुती गुरव, साताप्पा शेरवाडे, संतोष कोळी, बाबुराव निकम, पल्लवी पाटील, ललिता माने, अर्पणा परीट, राजाराम रायकर, नितीन गोरे व पूजा तुपारे.