कोल्हापूर : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानास्पद, द्वेषपूर्ण आणि माहितीहीन वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवणार्या रामनाथगिरी महाराज यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत मुस्लिम बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. सामाजिक सलोखा बिघडवणार्या रामनाथगिरी महाराज यांना तातडीने अटक करा, अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली.
रामनाथगिरी महाराज यांनी 15 ऑगस्ट रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वक्तव्य केले. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्य व देशभर उमटत आहेत. या वक्तव्याने समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. समाजात असंतोष व नाराजी निर्माण झाली आहे. मोहम्मद पैगंबर यांना सर्वस्व मानणारे तब्बल 400 कोटी लोक जगभरात राहतात. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचे काम रामनाथगिरी महाराज यांनी केले, असा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करत निषेध करण्यात आला.
सामाजिक सलोखा जाणीवपूर्वक बिघडवण्याचे काम केले जात आहे. दलित आणि मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या भावना भडकावून, दंगे भडकवले जात आहते, जे स्वातंत्र्यासाठी कधीही लढलेले नाहीत, त्यांचे अशांतता पसरवण्याचे काळे मनसुबे उधळून लावा. शांततेच्या मार्गाने, संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार न्याय तत्त्वाने याविरोधात एकजूटी लढत राहू, धर्मनिरपेक्षता, शांतता, सलोखा कायम राखू, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी वसंतराव मुळीक, माजी महापौर आर. के. पोवार, काजी अशरफ, भारती पोवार, महेशकुमार कांबळे, सुकुमार कांबळे, सुनीता पाटील, मुफ्ती गुफरान काझी, प्रा. सुभाष जाधव, कादर मलबारी आदींनी भावना व्यक्त केल्या.
यानंतर मौलाना इरफान कास्मी, मौलाना उसामा, मौलाना अझहर सम्मद, मौलाना अब्दुल रऊफ, हाफिज उमर मुजावर, हाफिज समीर उस्ताद, मौलना अ. समद, काझी अशरफ, हाफिज सिद्दीक बागवान यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. यावेळी रामनाथगिरी महाराज यांच्याविरोधात तक्रार अर्ज देऊनही गुन्हा नोंद झालेला नाही, यामुळे तत्काळ गुन्हा दाखल करा आणि कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एकाच व्यक्तीवर एकाच कारणासाठी अन्य ठिकाणी गुन्हा नोंद झाला असेल तर तो अन्य ठिकाणी नोंद करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. याउलट आपण दिलेल्या तक्रारी मूळ गुन्ह्यात पुरावे म्हणून सादर केल्या जातील, असे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी गणी आजरेकर, हाजी इरशाद बंडवल, तौफीक मुल्लाणी, जाफर बाबा, हाजी अस्लम सय्यद, मुश्ताक मलबारी, फजल मुजावर, सलमान मौलवी, युसूफ शेख,इमरान संनदी, कैस बागवान, जब्बार मुजावर, रियाज सुभेदार आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.