

कोल्हापूर : डिबेंचरची कपात केलेली रक्कम वेगळ्या मार्गाने दूध उत्पादकांना परत करण्यात येईल, अशी ग्वाही गोकुळचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दूध संस्था व दूध उत्पादकांच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिली. याबाबत शुक्रवारी (दि. 17) निर्णय जाहीर केला जाईल असेही त्यानी सांगितले. दरम्यान, आंदोलकांसमोर बोलताना शौमिका महाडिक यांनी संचालकांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून दिलेले आश्वासन गोकुळने पाळले नाही तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.
मोर्चानंतर शिष्टमंडळाने ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात संचालकांची भेट घेतली. यावेळी डोंगळे यांच्यासह अजित नरके, प्रा. किसन चौगुले, बाळासाहेब खाडे, अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, कर्णसिंह गायकवाड, एस. आर. पाटील उपस्थित होते. चर्चेला सुरुवात करताना शौमिका महाडिक म्हणाल्या, गेल्या 30 वर्षांपासून डिबेंचर कपात करून घेतले जाते हे मान्य आहे. परंतु 40 टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही डिबेंचर कपात करून घेतले नाही. ही अन्यायी कपात रक्कम परत करावी.
30 वर्षांचा भ्रष्टाचार कमी करून आम्ही दूध उत्पादक शेतकर्यांना जादा रक्कम देत आहोत, असे गोकुळचे नेते सांगतात हे चुकीचे आहे. काय भ्रष्टाचार कमी केला याचेही त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही महाडिक यांनी केली. प्रवीण पाटील यांनी गोकुळच्या ठेवी 500 कोटींच्या वर असताना डिबेंचर कपात का करता, असा सवाल केला. अरुण डोंगळे म्हणाले, पूर्वी आम्ही बिनपरतीच्या ठेवी म्हणून रक्कम कपात करून घेत होतो. परंतु सरकारने त्यावर बंधन आणल्यामुळे डिबेंचर सुरू करण्यात आले. दूध उत्पादक आणि दूध संस्थांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
290 कोटींच्या ठेवी
गोकुळच्या ठेवी 512 कोटी आहेत. परंतु त्यातील रक्कम कशासाठी वापरली जाणार आहे ते स्पष्ट करत गोकुळकडे सध्या 290 कोटींच्या ठेवी असल्याचे अजित नरके यांनी सांगितले. त्यानंतर ते त्याबाबत सविस्तर माहिती सांगू लागले. त्यांना विश्वास जाधव, हंबीरराव पाटील, प्रवीण पाटील यांनी अडविले. त्यामुळे पुन्हा गोंधळ झाला. शौमिका महाडिक यांनी हस्तक्षेप करत नरके यांना डिबेंचरच्या रकमेबाबत बोला, असे सांगितले.
टाळ्या वाजवून प्रतिसाद
यावेळी अरुण डोंगळे यांनी डिबेंचरची कपात केलेली रक्कम दूध उत्पादकांना वेगळ्या मार्गाने दिली जाईल. अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे याबाबत शुक्रवारी निर्णय जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत आपण थांबावे असे सांगितले. त्याला आंदोलकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी विश्वास जाधव, हंबीरराव पाटील, अनिल सावकार-मादनाईक, राजवर्धन नाईक-निंबाळकर, जोतिराम घोडके, भगवान काटे, दीपक पाटील, हरिष चिंदणे, धैर्यशील माने आदी उपस्थित होते.
उद्यापर्यंत थांबू : महाडिक
या बैठकीचा वृत्तांत शौमिका महाडिक यांनी बाहेर येऊन आंदोलकांना सांगितला. त्या म्हणाल्या, आपल्या एकीचा हा विजय आहे. त्यामुळे प्रथमच किमान संचालक मंडळ सकारात्मक चर्चेस तयार झाले. संचालकांनी शुक्रवारी निर्णय जाहीर करतो असे सांगितले आहे. त्यामुळे उद्यापर्यंत आपण वाट पाहू. त्यांनी शब्द नाही पाळला तर हे आंदोलन सुरूच राहील.
गोकुळच्या काचा आम्ही फोडत नाही...
निवडणूक आली आहे म्हणून गोकुळमध्ये गर्दी होऊ लागली आहे. हे आम्हाला माहिती आहे, असे डोंगळे म्हणताच शिष्टमंडळाने त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे बैठकीत थोडा गोंधळ झाला. एका कार्यकर्त्याने आम्ही आंदोलन करतो, पण संस्थेच्या काचा फोडत नाही, अशी टिपणी केली.
पत्र देणार्या संस्थांचे डिबेंचर देऊ नका
काही दूध संस्थांनी डिबेंचरची रक्कम आम्हाला परत नको असल्याचे पत्र दिले आहे, असे गोकुळच्या वतीने सांगितले जात आहे. आमची काही तक्रार नाही. ज्यांनी पत्र दिले आहे त्यांचे डिबेंचर ठेवा. परंतु मागणी करणार्या सर्व संस्थांची कपात केलेली रक्कम मिळाली पाहिजे, असे महाडिक यांनी सुनावले.
हे काय नवीन नाही
गेल्या तीस वर्षापेक्षा अधिक काळ आपण व विश्वास पाटील संचालक असल्यामुळे गोकुळवर कोणताही आरोप झाला की आमचे नाव येतेच. त्यामुळे हे आम्हाला नवीन नाही, असे डोंगळे उपरोधाने म्हणाले.
कागलचे दूध उत्पादक सहभागी
आंदोलकाची सुरुवात गडहिंग्लजमधून चंद्रकांत गुरव यांनी केली. भीतीने संस्था चालक आंदोलनात सहसा सहभागी होतान दिसत नाहीत. परंतु आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रतिनिधी उपस्थित आहेत. कागल तालुक्यातीलही दूध उत्पादक आले आहेत, असे शौमिका महाडिक म्हणाल्या.