कोल्हापूर : विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी

दहा जागांसाठी 26 जणांनी केली उमेदवारीची मागणी
Crowd of aspirants from Congress for Assembly
विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दीPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची चांगलीच गर्दी आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेसाठी जिल्ह्यातून इच्छुक असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये 34 जणांनी अर्ज नेले होते. त्यापैकी 26 जणांनी उमेदवारी मागणीचे अर्ज शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सादर केले. यामध्ये कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांचा एकमेव अर्ज आला आहे.

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका ऑक्टोबर 2024 मध्ये होण्याची शक्यता असून या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असणार्‍यांना शनिवार (दि.10) पर्यंत उमेदवारी मागणीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. त्यासाठी पक्ष निधी म्हणून सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी 20 हजार व महिला आणि मागासवर्गीयांसाठी 10 हजार रुपये अशी रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार 34 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणीचे अर्ज नेले त्यापैकी 26 उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केले आहेत.

कोल्हापूर उत्तरमधून 6 जणांनी उमेदवारी मागितली असून त्यात आ. जयश्री जाधव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, दुर्वास कदम आदींचा समावेश आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून 5 जणांनी उमेदवारी मागितली असून त्यामध्ये अप्पी पाटील, गोपाळ पाटील, विद्याधर गुरंबे, शामगोंड आरबोळे यांचा समावेश आहे. करवीरमधून राजेश पाटील व कॅप्टन उत्तम पाटील-शिंगणापूरकर यांचा समावेश आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आ. राजूबाबा आवळे यांच्यासह दोघांनी उमेदवारी मागितली आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून तिघांनी उमेदवारी मागितली असून त्यामध्ये राहुल खंजिरे, संजय कांबळे व संजय तेलनाडे यांचा समावेश आहे. शिरोळमधून गणपतराव पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. याशिवाय राधानगरी-भुदरगड मधून 3, कागलमधून 2 तर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास एक जण इच्छुक आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news