नृसिंहवाडी : नृसिंहवाडी-औरवाड येथील जुन्या पुलावर मगरीचा संचार सुरू झाला असून वाहनधारक तसेच या पुलावर मासेमारी करणारे लोक येत असतात. यामुळे ग्रामस्थांमध्ये भिती पसरली आहे. मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आज (दि.१) मगर निदर्शनास येताच त्यांनी मगरीचा व्हिडिओ व्हायरल केला.
औरवाड - कागवाड रस्त्यावर भूयारी गटारीचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गाने जुन्या पुलावरून लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू केली आहे. नृसिंहवाडी-औरवाड वाहतूक सुरू आहे. या पुलावर आज (मंगळवारी) पहाटे मासे पकडण्यासाठी आलेल्या काही व्यक्तींना ही मगर दिसून आली. अंदाजे पाच फूट लांब असलेली मगर पुलावरून फिरताना दिसून आली. पहाटे मासेमारी करणारे लोकांनी मगरीचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. या पुलापासून काही अंतरावर येथील दत्त मंदिर असून या पुलाखाली अनेक ग्रामस्थ जनावरे धुण्यासाठी घेऊन येत असतात. तसेच या पुलाजवळ स्वामी समर्थ केंद्र असून अनेक भक्त येथे हातपाय धुण्यासाठी येत असतात. तसेच येथील संगमघाटावर पक्षपंधरवडा सुरू असलेल्या कारणाने अनेक भाविक धार्मिक विधीसाठी येत असून या मगरीच्या वावराने पुलापासून दत्त मंदिर तसेच संगमघाटापर्यंत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तत्परतेने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.