कोल्हापूर : सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार यामुळे महाराष्ट्रतील जनता त्रस्त आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीतही जनता गनिमी काव्याने भाजपचा करेक्ट कार्यक्रम करेल, असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
काँग्रेसच्या उमेदवारांचे मंगळवारी (दि. 29) शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार असल्याची महितीही त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील जागा वाटप पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहेत, असे सांगून उत्तरच्या जागेबाबत बोलताना आ. पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तरमधून इच्छुकांची संख्या जास्त होती. सर्वच कार्यकर्ते चांगले होते. त्यामुळे निर्णय घ्यायला थोडा उशिरा झाला. सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी कधी मिळणार? असा प्रश्न नेहमी आम्हाला विचारला जायचा. म्हणून महपालिकेत प्रतिनिधित्व केलेल्या सामान्य कार्यकर्ताला उमेदवारी दिली आहे. आमदार जयश्री जाधव यांनी आपण जो निर्णय घ्याल तो मान्य असेल, असे सांगितल्यामुळे तरुण कार्यकर्ता असलेल्या राजेशला उमेदवारी दिली.
महाविकास आघाडीतील बंडखोरी रोखण्यासाठी इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाशी आपली चर्चा सुरू आहे. ए. वाय. पाटील यांनी अपक्ष लढू नये, अशी समजूत काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. लोकसभेला ते आमच्या सोबत होते. त्यामुळे विधानसभेला देखील त्यांना आमच्यासोबत रहावेत याद़ृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही आ. पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवरांचे अर्ज शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी (दि. 29) भरण्यात येणार आहे. यासाठी सकाळी दहा वाजता दसरा चौकातून मिरवणुकीस सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये खासदार शाहू महाराज यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.