इचलकरंजी : यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट 75 पैशांची अतिरिक्त व 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट एक रुपयांची अतिरिक्त वीज सवलतीच्या अंमलबजावणीचा अध्यादेश सोमवारी शासनाने जारी केला. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करून वीज सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्च 2024 पासून करण्यात येणार आहे, अशी माहिती आ. प्रकाश आवाडे यांनी दिली. या अध्यादेशामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वस्त्रोद्योगातील प्रमुख घटक असलेला यंत्रमाग व्यवसाय विविध कारणांनी अडचणीत सापडला आहे. त्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी वीज सवलत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात जाहीर केले होते. मात्र जाचक अटीमुळे अंमलबजावणी झाली नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजीतील कार्यक्रमात ऑनलाईन-ऑफलाईन नोंदणीची जाचक अट रद्द करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नोंदणीची अट रद्द करून वीज सवलत देण्याबाबत मंत्रिमंडळाने बैठकीत मंजुरी दिली. मात्र अंमलबजावणी झाली नव्हती. प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ. आवाडे आणि जि.प. माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आज शासनाने वीज सवलत अंमलबजावणीचा अध्यादेश जारी केला.