

कोल्हापूर : पारंपरिक लवाजमा, रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्या, नेत्रदीपक आतषबाजी, ढोल-ताशाचा अखंड गजर, पारंपरिक वाद्यांचा ठेका, अशा उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव सोमवारी रात्री झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराणी ताराराणी की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा जयघोषात आणि कोल्हापूरकरांच्या प्रचंड उपस्थितीत रथोत्सव मार्ग गजबजून गेला होता.
छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी अंबाबाईच्या रथोत्सवानंतर छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या शौर्याला व पराक्रमाला उजाळा देणारा हा रथोत्सव साजरा केला जातो. सोमवारी रात्री साडेआठ वाजता भवानी मंडपातून रथोत्सवाला प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती व ताराराणी यांची प्रतिमा होती. यावेळी खासदार शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजराजे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, वसंतराव मुळीक, अॅड. रणजित चव्हाण, इंद्रजित सावंत, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड, विक्रम जरग, राजू मेवेकरी, संजय पवार, फत्तेसिंह सावंत, किशोर घाटगे, हर्षल सुर्वे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमार्गे बालगोपाल तालीम मंडळ येथे रथोत्सवाचे जोरदार स्वागत झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी आतषबाजीने रथोत्सव मार्ग उजळून गेला. ढोल-ताशा पथकाने यावेळी सादरीकरण केले. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरीमार्गे आझाद गल्ली चौक तसेच पुन्हा भवानी मंडप येथे रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सवाच्या मार्गावर विविधरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अभूतपूर्व उत्साहात साजरा झालेल्या रथावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. बालचमू छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते.
रथोत्सव मार्गावर ठिकठिकाणी रथाचे जोरदार स्वागत झाले. चौका-चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे होते. त्यांच्या माध्यमातून शिवचरित्रातील अनेक घटना साकारण्यात आल्या होत्या. चौकाचौकांत भगव्या झेंड्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व पुतळ्यासमोर आकर्षक रांगोळ्या सजल्या होत्या.