

सुनील कदम
कोल्हापूर : शासन एकीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विकसित करायच्या तयारीत असतानाच दुसरीकडे याच ठिकाणी नवनवीन बॉक्साईट खाणींचे प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत. या नवीन खाणींमुळे संपूर्ण व्याघ्र प्रकल्पच बाधित होण्याचा धोका आहे. त्यामुळे या नवीन खाणींच्या प्रस्तावांची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पाच जानेवारी 2010 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली असून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र आहे. 1165 चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या प्रकल्पापैकी 600 चौरस कि.मी. गाभा क्षेत्र (कोअर झोन) तर 565 चौ. कि.मी. बफर झोन आहे. 15 वर्षांपूर्वी या प्रकल्पाची स्थापना झाली असली तरी या ठिकाणी वाघांचा कायमस्वरूपी अधिवास निर्माण होऊ शकलेला नाही. त्यामुळे शासनाने विदर्भातील जंगलातून पाच वाघ-वाघिणी आणून त्यांचे या जंगलात पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केलेली आहे.
एकीकडे या प्रकल्पात वाघांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे याच प्रकल्पाच्या कोअर आणि बफर झोनमधून बॉक्साईट उत्खननासाठी काही नवीन खाणींचे प्रस्ताव दाखल झाले असून ते अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहेत. प्रामुख्याने शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यातील हे प्रस्ताव आहेत. या नवीन खाणींना पर्यावरणाच्या व अन्य मुद्द्यांवरून स्थानिक नागरिकांचा विरोध असला तरी प्रशासकीय पातळीवरून त्यांच्या अंतिम मंजुरीच्या हालचाली सुरू आहेत.
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर गावासह याच परिसरातील कित्येक हेक्टर जमीन या बॉक्साईट खाण मालकांना देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे बॉक्साईट खाणीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणारी ही जमीन व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात येते किंवा नाही याची खातरजमा करण्याची तसदीही शासकीय अधिकार्यांनी घेतलेली दिसत नाही. कारण मालकांच्या म्हणण्यानुसार या जमिनी त्यांना देण्याचे नियोजन आहे.
शाहूवाडी तालुक्यातील घुंगूरवाडी येथील एका बॉक्साईट खाणीमधून पाच वर्षांच्या कालावधीत जवळपास 6 ते 7 लाख टन बॉक्साईटची खोदाई करण्याचे नियोजन आहे. नव्याने प्रस्ताव दाखल झालेल्या सर्व खाणींचा विचार करता येथून किती मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होणार आहे, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे या खाणींमुळे भविष्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ राहतील का आणि त्यांचे अस्तित्व तरी टिकून राहील का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या बॉक्साईट खाणींना परवाना देऊ नये, अशी मागणी या भागातून होत आहे.
आठ-दहा वर्षांपूर्वी चंदगड, भुदरगड, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यांत बराच काळ बॉक्साईट आणि लिटराईटच्या खाणी सुरू होत्या. या खाणींमध्ये चालणारा खडखडाट, सुरुंगांचे आवाज आणि वाहनांची घरघर यामुळे या भागातील हजारो वन्य प्राण्यांनी या भागातून अन्यत्र स्थलांतर किंवा पलायन केले आहे. केवळ प्राणीच नव्हे, तर अनेक पक्षीही या भागातून गायब झाले आहेत. हा पूर्वानुभव विचारात घेऊन नव्याने होऊ घातलेल्या खाणींना परवाने देऊ नयेत, अशी या भागातील लोकांची मागणी आहे.