

हमीदवाडा : मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील मेतके येथील श्री हालसिद्धनाथ- बाळूमामा मंदिरात सद्गुरू बाळूमामा यांचा 133 वा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात झाला. यावेळी ढोलांचा दणदणाट, भंडार्याची प्रचंड उधळण व बाळू मामांच्या जयजयकारात भाविक दंग होते.
मेतके हे महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध— राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शनिवारी दुपारी 4 वाजून 23 मिनिटांनी येथील श्री हालसिद्धनाथ- बाळूमामा मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा पार पडला. जन्मोत्सवासाठी भाविकांची मांदियाळी जमली होती. तसेच निमंत्रित केलेल्या वालंग मंडळांनी ढोलवादनांनी वातावरण दणाणून गेले होते. सकाळी ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती झाली. दुपारी वालंगचा कार्यक्रम झाला. यावेळी संपूर्ण मंदिर, गाभारा व पाळणा याची फुलांनी आकर्षक सजावट केली होती. मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. भक्तांनी जन्मकाळवेळी पाळण्यावर पुष्पवृष्टी केली तसेच पाळणा म्हटला. महाआरती सोहळ्यानंतर महाप्रसाद वाटप झाले.
हा सोहळा पार पडण्यासाठी श्री सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सदस्य दयानंद पाटील, बळीराम मगर, बाबासाहेब पाटील, देवाप्पा पुजारी तसेच गावातील सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी नियोजन केले होते.