

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींच्या समता नगरीत प्रतिवर्षीप्रमाणे बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे 20 वे वर्ष आहे. यानिमित्त दिला जाणारा बळीराजा सन्मान पुरस्कार यंदा संजय गुदगे, सुरेश चौगले व रेश्मा खाडे यांना जाहीर झाला आहे. या महोत्सवांतर्गत दि. 22 व 25 ऑक्टोबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तिघांचा बळीराजा सन्मानाने गौरव
जिल्ह्यातील असंघटित कामगारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून सक्रिय संजय गुदगे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल व संविधान संवाद समितीच्या माध्यमातून सक्रिय असणार्या रेश्मा खाडे व राष्ट्रसेवा दल, समाजवादी-पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून कष्टकरी कामगार व महिलांच्या सबलीकरणासाठी सक्रिय सुरेश भीमाप्पा चौगुले यांना बळीराजा सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.
महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम
बळीराजा महोत्सवाची सुरुवात बुधवार, दि. 22 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता बिंदू चौकात बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाच्या प्रतिमापूजनाने होईल. मान्यवरांच्या हस्ते ‘दिवाळी अशी साजरी करावी’ या पत्रकाचे वाटप होईल. शनिवार, दि. 25 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता मिरजकर तिकटी येथून बळीराजाची मिरवणूक व गंगावेस येथील शाहू सत्यशोधक समाज कार्यालयासमोरील महात्मा जोतिबा फुले खुल्या सभागृहात शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्राचे प्रा. डी. यू. पवार यांचे ‘बळीराजा संस्कृती हीच भारतीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होईल.