

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील पेट्रोलपंपासमोरील हॉटेल आणि बिअरबारचे मालक व आणि ग्राहक यांच्यात रविवारी सायंकाळी जोरदार राडा झाला. ग्राहकाने हॉटेल मालकाला मारहाण करून जखमी केले. शिवाय हॉटेलमधील टेबल, खुर्च्यांसह साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाबासाहेब शंकर पाटील (रा. अंबाई टॅकजवळ, रंकाळा कोल्हापूर) व रूपेश रघुनाथ खांडेकर (पाडळी खुर्द, ता. करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. हॉटेल मालक सतीश भिवा पन्हाळकर (वय 41, रा. बालिंगा, करवीर) यांच्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित बाबासाहेब आणि त्याचा साथीदार रूपेश हॉटेलमध्ये मद्यप्राशनासाठी बसले होते. यावेळी मोठ्या आवाजात शिवीगाळ करू लागले. शेजारी बसलेल्या ग्राहकांना त्याचा त्रास होऊ लागला.
हॉटेल कर्मचारी तानाजी कांबळे यांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तथापि वाद वाढतच गेला. आरडा-ओरडा सुरू झाल्याने मालक सतीश दाखल झाले. मालकाला शिवीगाळ करून अंगावरील शर्ट फाडण्यात आला. पन्हाळकर यांनी डायल 112 ला कॉल केल्यानंतर संशयिताला मालकाचा राग आला. मालकाच्या छातीत लाथ मारून त्यांना जखमी करण्यात आले. शिवाय हॉटेलमधील टेबल, खुर्च्यांसह साहित्याची तोडफोड करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांना अद्याप अटक झालेली नव्हती.