Ashish Shelar : ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार : शिवरायांच्या वाघनखांचे प्रदर्शन सुरू
Ashish Shelar
‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार
Published on
Updated on

कसबा बावडा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन काळात मराठा योद्ध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या शस्त्र प्रदर्शनाचे भोसले घराण्याशी संबंधित सातारा, नागपूर व कोल्हापूर या शहरांमध्ये प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा उपक्रम न राहता तो लोकोत्सव म्हणून साजरा करण्याच्या द़ृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथे मंगळवारी ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या उपक्रमांतर्गत लंडन येथून आणलेली छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखं व मराठाकालीन शस्त्र प्रदर्शनाचे शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन, तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संयुक्तरीत्या उद्घाटन केले. मंत्री शेलार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रदर्शन आठ महिने सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पोलिस दल तसेच संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या साहाय्याने संपूर्ण जिल्हाभर चित्रकला, व्याख्यान यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. या माध्यमातून महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सर्वांसमोर येईल. यासाठी सांस्कृतिक विभाग सर्वतोपरी सहाय्य करेल. खा. शाहू महाराज म्हणाले, या शस्त्र प्रदर्शनामधून मराठा शैली आणि इतर भारतीय शैलीची अप्रतिम सांगड दिसते आहे. सामान्य जनतेसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे. या प्रदर्शनात केवळ शस्त्रे नाहीत, तर तो एक सजीव वारसा आहे.

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आणि कोल्हापूर शहरात आठ महिने चालणार्‍या या प्रदर्शनात नागरिकांना दांडपट्टा, ढाली, तलवारी, बर्चे, भाले, वाघनखे यांसारखी तब्बल 235 विविध शिवकालीन मराठा योद्ध्यांची शस्त्रे पाहता येणार आहेत. यावेळी आझाद नाईकवडी यांनी सहकार्‍यांसमवेत पोवाडा सादर केला, तर भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ येथील सव्यासाची गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके लखन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी आदी उपस्थित होते.

शिवरायांचा आदर्श घ्यावा?

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्याने राज्य शासनाने कोल्हापुरात वाघनखं आणली आहेत. महाराजांचा देदीप्यमान इतिहास युवा पिढीपुढे यावा, युवा पिढीने प्रेरणा घ्यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सर्वांनी कार्यरत राहावे, अशी अपेक्षा पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news