राज्यात ‘महायुती’चीच सत्ता येणार : अमित शहा

पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धार; आवाडे पिता-पुत्रांचा भाजपमध्ये प्रवेश
Amit Shah
अमित शहा
Published on
Updated on

कोल्हापूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्या ‘महायुती’चीच सत्ता येणार आहे. एवढेच नाही, तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून कामाला लागावे, असा कानमंत्रही शहा यांनी यावेळी दिला. दरम्यान, इचलकरंजीचे ज्येष्ठ नेते आ. प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे यांच्यासह यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

Amit Shah
Maharashtra Politics | जागावाटपात सन्मान राखणार : अमित शहा

भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. विधानसभेला पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खा. धनंजय महाडिक आदी प्रमुख उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल. त्यासाठी शरद पवार आणि कंपनीचा पराभव केला पाहिजे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे बूथ लेव्हलच्या नाराज कार्यकर्त्यांना हेरून त्यांना भाजपकडे वळवा. विरोधी पक्षांचे बूथ कमकुवत झाल्यास भाजप अधिक मजबूत होणार आहे.

शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र, जगात सलग तीन वेळा सत्ता आणि पंतप्रधानपद मिळविलेला पक्ष म्हणजे भाजप आणि नरेंद्र मोदी आहेत. राहुल गांधी यांच्या काँग्रेसला गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या एकूण जागांपेक्षा यंदाच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जागा जास्त आहेत, हे कार्यकर्त्यांनी विसरू नये. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधानाबाबत केलेला खोटा प्रचार आता जनतेला समजला आहे. त्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक बदल झाला आहे. काँग्रेसला कमी जागा मिळूनही राहुल गांधी विजयी झाल्याच्या आविर्भावात आहेत; मग आपण सत्ता मिळवूनही निराश का? असा सवाल शहा यांनी कार्यकर्त्यांना केला.

एकत्र लढून जिंकूया

मतदानादिवशी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या कुटुंबासह अन्य तीन कुटुंबांतील मतदान सकाळी अकराच्या आत केल्यास भाजपचा विजयाचा मार्ग सोपा होईल, असे सांगून शहा म्हणाले, ही निवडणूक रणनीतीने लढवत शक्ती केंद्र, बूथ, मंडळ या स्तरावरील कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवून प्रत्येक बूथवर दहा टक्के मतदान वाढेल, असे नियोजन करावे. विरोधकांना मतदान केंद्राबाहेर टेबल लावण्यास कार्यकर्ते मिळणार नाहीत, याची व्यवस्था करावी. सहकारी संस्था, महिला बचत गटांना भाजपशी जोडण्याचे काम करावे. बूथ लेव्हलचा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. कारण, हाच देशाचा गृहमंत्री होऊ शकतो. हे भाजपमध्ये घडते त्याचे उत्तम उदाहरण स्वत: आपण असल्याचे शहा यांनी सांगितले. कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण एकच चिन्ह मानून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. पक्षाचे नुकसान होईल, असे कृत्य करू नये. कारण, सर्वांनी एकत्र लढून जिंकण्याची ही निवडणूक आहे.

शहा म्हणाले, भाजपने दहा वर्षांत राम मंदिर उभारणी, 370 कलम हटविणे, तीन तलाक बंदी कायदा, अशी महत्त्वाची कामे केली असून, देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आणली आहे. भविष्यात तिसर्‍या क्रमांकावर अर्थव्यवस्था येईल. 2014 च्या विधानसभेवेळी प्रचाराचा शुभारंभ आणि समारोप कोल्हापुरातून करून विजय संपादन केला. आता पश्चिम महाराष्ट्राचा प्रचार शुभारंभ कोल्हापुरात करून भाजप सरकार सत्तेत आणण्याचा संकल्प आपण केला आहे, असे शहा म्हणाले.

सर्व समाजघटक भाजपसोबत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांनी केलेल्या ‘फेक नरेटिव्ह’मुळे लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, आज परिस्थिती बदलली असून, जनता आपल्या पाठीशी आहे. राज्यातील मातंग समाज, वाल्मीकी म्हेतर समाज, आदिवासी समाज असे सर्व समाजघटक भाजपसोबत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचाही पाठिंबा मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचाही पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यास अडचण नाही. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘व्होट जिहाद’बाबत जागरूक व्हा

फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोदींना हरविण्यासाठी झालेल्या ‘व्होट जिहाद’बाबत आता जागरूक राहिले पाहिजे. शरद पवारांच्या काळात जे झाले नाही ते दुष्काळ हा शब्द हटविण्याचे काम भाजपने केले आहे. कोल्हापूर, सांगलीला पडणारा महापुराचा वेढा संपवून दुष्काळी भागास पाणी देण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, लोकसभेवेळची परिस्थिती सध्या नाही, जनमानस बदलले आहे. त्यामुळे विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकावण्यास कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. खोट्या प्रचारास त्याच भाषेत उत्तर देण्याची धमक कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारने राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचे आवाहन केले. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर आंदोलन करून काँग्रेस पक्ष आरक्षणविरोधी आहे, हे जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे, असे सांगितले. खा. धनंजय महाडिक यांनी आभार मानले.

भाजपच प्रमुख पक्ष

पश्चिम महाराष्ट्रात प्रमुख पक्ष भाजपच आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे चांगले यश मिळणारच. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने निवडणुकीस सामोरे जावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

‘मी मावळा’ संकल्पना राबवा

सरकारने राबविलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मी मावळा’ ही संकल्पना राबवावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

…म्हणूनच जनतेची भाजपला साथ : अमित शहा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news