अकिवाट दुर्घटना : इकबाल बैरागदार बेपत्ताच; शोध मोहीम थांबवली
सैनिक टाकळी: पुढारी वृत्तसेवा : अकिवाट (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीत ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात वाहुन गेलेल्या व्यक्तीचा शोध दिवसभर सुरू होता. एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या ३० जवानांकडून बोटीच्या माध्यमातून सुरू असलेल्या शोध मोहिमेत दुपारी १२च्या दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्स पथकास अण्णासो हसुरे यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. सायंकाळी सहा पर्यंत सर्वच पथकांना इकबाल बैरागदार यांचा शोध लागला नाही. त्यामुळे अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. दिवसभर पावसाने अडथळा न आणल्याने प्रभावीपणे शोध मोहीम राबवण्यात आली. पुन्हा उद्या सकाळी शोध कार्य केले जाणार आहे. (Kolhapur Flood)
अकिवाट बस्तवाड दरम्यान महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेला आज दोन दिवस पूर्ण झाल्याने गावात भीती सदृश शांतता होती. गावच्या प्रमुख दोन नेत्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. (Kolhapur Flood)
दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नावे
दुर्घटनेतील एकूण नागरिकांची संख्या आठ होती. त्यामध्ये सुहास पाटील (मृत), अण्णासो हसुरे (मृत), इकबाल बैरागदार (बेपत्ता), रोहिदास माने (जखमी), अंगद मोहिते, प्रदीप पाटील, श्रेणिक चौगुले, अरुण कोथळी (सुखरूप) यांचा समावेश आहे. (Kolhapur Flood)