

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावावर एअरगनने गोळी झाडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. यात सुरेश कल्लाप्पा हेब्बाळे (वय 45) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश व त्याचा भाऊ चंद्रकांत कल्लाप्पा हेब्बाळे यांच्यात शेतजमिनीच्या वाटपावरून वाद सुरू आहे. बुधवारी सुरेश शेतात सोयाबीन कापणीचे काम आटोपून घरी आले असताना पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रागाच्या भरात चंद्रकांतने एअरगनद्वारे गोळी झाडली. गोळी सुरेश यांच्या पाठीवर लागल्याने ते जखमी झाले.
उपचारासाठी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालयातून वर्दी आल्यानंतर पोलिसांनी जखमी सुरेश हेब्बाळे याचे जबाब नोंदवून घेत चंद्रकांत हेब्बाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.