संजय मंडलिक : ‘नवीनच ठरलंय’ ते टोकाला नेणारच | पुढारी

संजय मंडलिक : ‘नवीनच ठरलंय’ ते टोकाला नेणारच

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : आमचं ठरलंय म्हणून गृहीत धरता काय? आता नवीनच ठरलंय. ते टोकाला नेणारच, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्यातील नेत्यांना खणखणीत इशारा दिला आहे. शिवसेनेचे संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी शिवसेना आता मागणार्‍याच्या नव्हे तर देणार्‍याच्या भूमिकेत असेल, असे सांगून नेते व कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवा, असे आवाहन केले आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या तीन संचालकांचा सत्कार रविवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आला होता, तेव्हा ते बोलत होते. यावेळी खा. संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील व अर्जुन आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला.

यापुढील सर्व निवडणुका शिवसेना म्हणून लढणार

जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही स्वाभिमानीच्या मुद्द्यावर लढविल्याचे सांगून मंडलिक म्हणाले की, गोकुळमध्ये आमचे सहा संचालक आहेत. तिथे तडजोड करताना शिवसेनेचे सहकारातील स्थान तुम्हाला मान्य आहे आणि जिल्हा बँकेत चर्चा करताना दोन जागा घ्या म्हणून सांगता. यामध्ये एकच झालं की आम्ही मित्र पक्ष आहोत असे म्हणत आणि आमचं ठरलंय हे गृहीत धरत काही सांगायला लागले.

त्यामुळेच आता गृहीत धरू नका. आता नवीनच ठरलंय. ते टोकाला नेणारच, असे सांगत मंडलिक यांनी बाजार समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शिवसेना ताकदीने लढवेल, असे स्पष्ट केले. कौरवांनी पांडवांना सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नाही म्हणून महाभारत घडलं, असे ते म्हणाले.

ताकद कळली

जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेनेला जे यश मिळाले, त्याबद्दल हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचे आभार मानले. त्यांनी जर आमच्या मागणीएवढ्या जागा दिल्या असत्या तर आम्ही लढलोही नसतो आणि आम्हाला ताकदही कळली नसती.

तलवारी म्यान करू नका

आता सहकारात शिवसेना ताकदीने उतरेल आणि यापुढे शिवसेना कधीही जागा मागणार्‍यांच्या नव्हे, तर जागा देणार्‍यांच्या भूमिकेत असेल हे लक्षात ठेवा, असे बजावत शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आपली एकजूट अशीच ठेवावी तर पुढच्या काळात यश आहे, असे सांगत संघटनेबरोबर जे राहणार नाहीत त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देत तलवारी म्यान करू नका, असे सांगितले.

शिवसेनेला पाडण्याचा कट जिल्हा बँकेतच रचला गेला

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार होते. त्यापैकी पाच आमदारांचा पराभव झाला. या सर्वांना निवडणुकीत पाडण्याचा कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा बँकेत ठरला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एका बाजूला महाविकास आघाडी म्हणत असताना दुसरीकडे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा, त्यांना डावलण्याचा आणि शिवसेनेला पराभूत करण्याचा कट जिल्हा बँकेत बसून ठरवत असतील तर त्यांच्या या प्रयत्नाला संघटित राहून शह दिला पाहिजे. आपण आपली एकजूट दाखवूया आणि सहकारासह जिल्ह्यात येणार्‍या सर्व निवडणुका शिवसेना म्हणून ताकदीने लढवूया, असेही ते म्हणाले.

माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी सत्ताधार्‍यांनी पॅनेलमधून बाहेर पडण्यास शिवसेनेस भाग पाडले ते योग्यच झाले. त्यामुळे आम्हाला आमची ताकद दाखविण्याची संधी मिळाली. अजून थोडा वेळ मिळाला असता तर यापेक्षा जास्त यश मिळाले असते, असे म्हणत जिल्हा बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी अभद्र युती झाल्याचे ते म्हणाले. आपला पाया घट्ट असेल तर कोणाला घाबरायची गरज नाही, असे सांगत स्वतंत्र निवडणूक लढवायचे त्यांनी संकेत दिले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी हुकुमशाहीविरुद्ध शिवसेनेने लढा दिल्याचे सांगून यापुढील निवडणुकीत काय भूमिका घ्यायची ते नेत्यांनी स्पष्ट करावे, असे सांगितले. विजय देवणे यांनी कारखान्यातील चौकशीपोटी हसन मुश्रीफ यांनी भाजपशी तडजोड केल्याचा पुनरुच्चार केला.

Back to top button