कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : सोयीच्या राजकारणाला लागणार सुरुंग? | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : सोयीच्या राजकारणाला लागणार सुरुंग?

कोल्हापूर; संतोष पाटील : शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) प्रस्थापितांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. निवडणूक झाली, आता निकालानंतर पुढे काय? हा सवाल आहे. दोन्ही आघाड्यांकडून सोयीचे राजकारण झाले. आपण सुटलो, आपला शिलेदार सहीसलामत बाहेर पडला म्हणजे झाले, अशीच काहीशी सर्वपक्षीयांची भूमिका राहिल्याने निकालाबाबत संभ—म वाढला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपसह मित्रपक्षांनी तसेच पडद्यामागील दिग्गजांनी केलेल्या सोयीच्या राजकारणाला निकालाने सुरुंग लागणार काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सत्ताधारी आणि विरोधी पॅनेलमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांचा भरणा आहे. नेत्यांपासून मतदारांपर्यंत प्रत्येकाला दोन्ही पॅनेलमधील ठराविक उमेदवारांबद्दल आकस आणि जिव्हाळा आहे. एकटाक संपूर्ण पॅनेल निवडून यावे, असे मनापासून वाटणारे मतदार आणि नेत्यांची संख्या किती आहे? मतदाराला सरासरी पाच ते सहा मतांसाठी शिक्का मारताना लागणारा वेळ, शिक्का मारण्यापूर्वी मतदारांनी घेतलेला दीर्घ ‘पॉझ’, चिन्ह पाहून नव्हे तर उमेदवाराचे नाव वाचून मतदान करणार्‍यांची असणारी प्रचंड संख्या हे सर्व प्रस्थापित आणि नवोदितांनाही धक्का देणारे ठरू शकते. ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

बँकेच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) साडेसात हजार मतदारांशी सतत आणि थेट संपर्क असलेला जिल्ह्यात असा एकही नेता नाही. तालुक्यातील संस्था गटापुरतेच नेत्यांनी आपले जिल्हा बँकेचे वर्तुळ कायम ठेवले होते. सर्वसाधारण जागांवर निर्णायक ठरणारा मतदार हा उमेदवार आणि नेत्यांची झूल यापासून लांबच होता. अशा सुमारे पाच हजारांहून अधिक मतदारांवर सामुदायिक नेतृत्वाचा प्रभाव आहे. राजकारणाकडे तटस्थपणे पाहणारा हा वर्ग असल्याने जिल्हा बँकेत धक्कादायक निकालाची परंपरा कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधी आघाडीने बाजी मारल्यास दोन्ही काँग्रेसना दोन पाऊल मागे जाऊनच भविष्यातील राजकारण करावे लागेल. दोनपेक्षा कमी जागांवर विरोधी आघाडी थबकली तर पुन्हा महाविकास आघाडीचा सारीपाट शिवसेनेला मांडावा लागणार आहे. विरोधी आघाडी किती जागांवर विजय मिळविणार, यावरच जिल्ह्यातील पुढील राजकारणाची समीकरणे मांडली जातील.

संमिश्र राजकारणाने वाढली चिंता ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

विरोधी आघाडीतही तीन उमेदवार भाजप मित्रपक्षाचे आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत खा. प्रा. संजय मंडलिक यांचे जिव्हाळ्याचे राजकीय संबंध असून, अजूनही तुटेपर्यंत ताणलेले नाही. दोन्ही बाजूंनी संवादाचा सेतू कायम आहे. शिवसेनेला सोडून माजी खा. निवेदिता माने सत्ताधार्‍यांसोबत राहिल्या.

आ. प्रकाश आवाडे यांचा भाजपशी घरोबा असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने किती एकदिलाने काम केले ते मतपेटी उघडल्यानंतर कळणार आहे? आ. विनय कोरे यांचा शब्द आता दोन्ही काँग्रेससाठी जड जाणार असल्याने याचे प्रतिध्वनी प्रक्रिया गटात उमटल्यास आश्चर्य वाटायला नको. ‘गोकुळ’चे माजी संचालक म्हणून विश्वास जाधव यांना मिळणारा प्रतिसाद राष्ट्रवादीची चिंता वाढविणारा होता. विरोधी आघाडीने मतदारांपर्यंत साधलेला थेट संवाद प्रस्थापितांनाही आश्चर्याचा धक्का देणारा असाच होता. नेते, उमेदवार आणि मतदारांच्या संमिश्र भूमिकेचा परिणाम म्हणून दोन्ही बाजूंनी केलेल्या सोयीच्या राजकारणाला मतदार ‘दे धक्का’ देणार काय? याची उत्कंठा सर्वच घटकांना लागून राहिली आहे.

Back to top button