कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मतदानादिवशीही नेत्यांमध्ये खडाजंगी | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मतदानादिवशीही नेत्यांमध्ये खडाजंगी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) चुरस मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पाहावयास मिळाली. मतदानाचा दिवसही बुधवारी आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळेच शिवसेनेने निवडणूक लादल्याचा आरोप पुन्हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. त्याला उत्तर देताना खा. संजय मंडलिक यांनी, पॅनेल केले म्हणून राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत असतील तर लोकशाहीमध्ये निवडणुका लढवायच्या की नाही, हे एकदा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारावयास हवे, असा टोला लगावला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी, जिल्ह्याचे राजकारण सध्या योग्य वळणावर असल्याचे सांगून, जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारे मुंबईत बसले असल्याचे सांगून नेत्यांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

जिल्हा बँक देशात नंबर एक बनविण्यासाठी प्रयत्न

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकोप्याने पॅनेल व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. परंतु; राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे दुदैर्र्वाने शिवसेनेने पॅनेल उभे केले. परंतु; संपूर्ण शिवसेना त्यांच्यासोबत नाही. खा. धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने आमच्या पॅनेलमध्ये आहेत. जिल्ह्यात मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या निवडणुकीत सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे 21 उमेदवार विजयी होतील. गेल्या सहा वर्षांत बँकेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. यापुढील काळात शेतकर्‍यांच्या दारात बँक नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकर्‍यांबरोबर यापुढील काळात उद्योजक, व्यावसायिक, महिला बचत गट यांनादेखील जास्तीत जास्त सुविधा देऊन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक भारतातील एक नंबरची बँक बनविण्यासाठी प्रयत्न करू.
– हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

यापुढेही शेतकर्‍यांच्या हिताचा कारभार

जिल्ह्यातील वातावरण आमच्या बाजूने आहे. त्यामुळे छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. बँकेने केलेल्या प्रगतीची सभासदांना जाणीव आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या हिताचा कारभार यापुढेही केला जाईल.
– सतेज पाटील, पालकमंत्री

मग निवडणुका घटनेतून काढून टाकायच्या का?

लोकशाहीमध्ये निवडणुका लढवायच्या की नाहीत, हे एकदा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारावयास हवे. पाच वर्षांतून एकदा लोकसभा, विधानसभा निवडणुका येतात. या निवडणुका घटनेने दिल्या आहेत. आमच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे निवडणूक होत असेल तर घटनेतून या निवडणुका काढून टाकायच्या का? आम्ही पॅनेल उभे केल्यामुळे मतदार उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडला आहे. हा मतदार आम्हाला साथ देईल. त्यामुळे आमच्या सर्व नऊ जागा विजयी होतील.
– खा. संजय मंडलिक

कोल्हापूरच्या जनतेला न्याय मिळेल

जिल्ह्यातील राजकारण योग्य वळणावर आहे. योग्य लाईन असल्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला न्याय मिळेल. जिल्हा बँकेत मी गेली 35 वर्षे आहे. जिल्हा बँकेचा कारभार योग्य माणसाच्याच हाती आहे. बँकेचा कारभार अयोग्य माणसाच्या हाती कधीच नव्हता. एकच माणूस बँक चालवणारा आहे. त्यामुळे यापुढे देखील योग्य माणसाच्या हातीच बँक राहील, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. जिल्ह्याचे राजकारण ठरविणारा मी कोण? ते रथी, महारथी मुंबईत बसले आहेत. मारुती लंकेत गेलेला नाही. अजून लंका पेटलेली नाही. पुढे बघू.    – महादेवराव महाडिक, माजी आमदार

Back to top button