कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चे नवे ६९ रुग्ण; एकाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चे नवे ६९ रुग्ण; एकाचा मृत्यू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागले आहे. बुधवारी नव्या 69 बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 57 जणांचा समावेश आहे. मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील 45 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला.

शासकीय प्रयोगशाळेत एकूण 773 नमुने तपासले. यामध्ये 4 बाधित आढळले. खासगी प्रयोगशाळेत 472 जणांची तपासणी झाली. यामध्ये 65 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनासद़ृश्य लक्षणे असलेल्या 160 जणांनी दिवसभरात तपासणी करून घेतली.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 7 हजार 170 बाधितांपैकी 2 लाख 1 हजार 133 जणांनी आजारावर मात केली. तर 5 हजार 799 जणांचा मृत्यू झाला.

‘ओमायक्रॉन’चे 5 रुग्ण

जिल्ह्यात ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. बुधवारी आणखी 5 नवे रुग्ण आढळले. लक्ष्मीपुरी, नागाळा पार्क, कळंबा येथे प्रत्येकी 1, तर गडहिंग्लज येथील 2 जणांचे जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 29 डिसेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला. कळंबा येथील हा रुग्ण आहे. त्याच्या वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा नमुना 30 डिसेंबर रोजी घेण्यात आला होता. कोलकाता येथून आलेल्या 36 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो विवेकानंद कॉलेज परिसरातील रहिवासी आहे.

लक्ष्मीपुरी येथील 43 वर्षीय व्यक्तीचा नमुना 27 डिसेंबर रोजी घेतला होता. त्याच्यासह गडहिंग्लज येथील दोघांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.

गडहिंग्लज येथे नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी एकजण केनियाहून आला होता. त्याच्यासह नातेवाईकास त्रास जाणवू लागल्याने दोघांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर कंटेन्मेंट झोन केला आहे.

Back to top button