कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : प्रत्येक हालचालीवर राहणार वॉच! | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : प्रत्येक हालचालीवर राहणार वॉच!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीची ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) प्रशासकीय तयारी मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाली. पोलिस बंदोबस्तात 325 कर्मचारी 13 ठिकाणी असलेल्या 40 केंद्रांवरील मतदान साहित्य घेऊन रवाना झाले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेतले. मोबाईल तसेच कॅमेरा नेण्यास बंदी तसेच सर्वच्या सर्व पाच मतपत्रिका पेटीत टाकल्या की नाही यावर प्रशासनाचा वॉच राहणार आहे. मतदान केंद्र परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) हायहोल्टेज लढतीकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. बँकेचे 7651 मतदार आहेत. किमान पाच मते देणार असल्याने 35 हजारांहून अधिक मतपत्रिका असतील. सकाळी आठ ते पाच या वेळेत जिल्ह्यातील 13 ठिकाणी असलेल्या 40 केंद्रावर मतदानाची सोय केली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमावलीचे पालन करूनच केंद्राची रचना केली आहे. मतदान केंद्रावर उमेदवारांना मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध केला आहे. उमेदवार प्रतिनिधी म्हणून केंद्रावर ठरावधारक उपस्थित राहणे बंधकारक केले आहे. भारत निवडणूक आयोगाने प्रमाणित केलेली 14 प्रकारची कागदपत्रे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत.

आजरा, शाहूवाडी तालुक्यात प्रत्येकी दोन, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यांत प्रत्येकी तीन, हातकणंगले, कागल, राधानगरी आणि पन्हाळा तालुक्यासाठी प्रत्येकी चार, कोल्हापूर शहरासाठी दोन आणि करवीर तालुक्यासाठी चार अशी सहा मतदान केंद्रे प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेत आहेत. 13 केंद्रांवर आठ सहायक निरीक्षकांची नेमणूक केली असून 325 कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रावर तैणात असतील.

…अशी आहे मतदार संख्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

जिल्हा बँकेत 7 हजार 651 मतदार आहेत. सरासरी पाच मते देण्याचा अधिकार असल्याने 35 हजार 500 मतपत्रिकांची संख्या होईल. संस्था गटात 1865 मते आहेत. कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया गटात 448 मतदार आहेत. नागरी बँक, पतसंस्था गटाचे भवितव्य 1221 मतदारांच्या हातात आहे. इतर सर्व प्रकारच्या संस्था तसेच व्यक्ती सभासद 4115 हे मतदार मतदान करतील. या गटातील सर्व मतदार आपल्या गटासह राखीव गटातील महिला दोन मते, विमुक्त जाती/ विशष मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागासवर्गीय गटासाठी मतदान करणार असल्याने या गटात सर्व म्हणजे 7651 मतदार हक्क बजावतील.

मतपत्रिकांचा रंग ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

  • सर्वसाधारण गट : पांढरा
  • महिला गट : पिवळा
  • अनुसूचित जाती : गुलाबी
  • भटक्या जमाती गट : पोपटी
  • कृषी पणन व शेतीमाल : नारंगी
  • बँक, पतसंस्था : हिरवा
  • इतर शेती संस्था : फिकट पिवळा
  • इतर मागासवर्गीय : निळा

सर्वात उच्चांकी मतदानाची शक्यता ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

जिल्हा बँकेच्या 21 संचालकांपैकी संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध निवडणूक झालेल्या गटातील मतदार इतर ठिकाणी मतदान करणार आहेत. त्यामुळे 7 हजार 651 पैकी फक्त 950 मतपत्रिका कमी होणार आहेत. 15 जागांसाठी मतदान होत असून 33 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा बँकेतील ईर्ष्येचे राजकारण पाहता आतापर्यंत सर्वांत उच्चांकी मतदानाची नोंद होईल, असा अंदाज आहे.

सोशल मीडियावर प्रचार

जाहीर प्रचाराची सांगता झाल्यापासून मागील 24 तासांत छुपा प्रचार आणि गाठीभेटींचा जोर वाढला होता. उमेदवार आणि नेत्यांनी मागील 15 दिवसांपासून पायाला बांधलेली भिंगरी थंडावली. तालुक्याच्या ठिकाणी बसून सूत्रे हलवली जात होती. प्रमुखांना निरोप देणे, फोनवरून मतदारांच्या संपर्कात राहून मतदानाचे आवाहन केले जात होते. सोशल मीडियावरून उमेदवार आपली भूमिका स्पष्ट करत होते. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोशल मीडियावर प्रचाराचा जोर कायम राहणार आहे.

करवीर : 987 मतदार बजावणार मतदान हक्क 

कसबा बावडा : तालुक्यातील मतदारांसाठी वि. स. खांडेकर प्रशाला, प्रतिभानगर, कोल्हापूर येथील मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. करवीर तालुक्यातील 987 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीमध्ये विकास संस्था गटातून करवीर तालुक्यामधून आमदार पी. एन. पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. गट क्र. 2 – कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया या गटासाठी 45 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. गट क्र. 3 – नागरी बँक पतसंस्था गटातून 98 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. वरील दोन्ही गटांसाठी केंद्र क्र. 19 येथे मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. गट क्र. 4 – इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून 593 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या गटासाठी केंद्र क्रमांक 20 येथे 300 मतदारांसाठी तर केंद्र क्र. 21 येथे 293 मतदारांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील 987 (विकास सेवा संस्था गटातील 251 (केंद्र क्र. 18) सह) मतदार महिला गट – 2, अनुसूचित जाती जमाती गट – 1, इतर मागासवर्गीय गट – 1, विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गट – 1. अशा विविध आरक्षित गटातील पाच उमेदवारांच्या निवडीसाठी मतदान करणार आहेत.

वि. स. खांडेकर प्रशाला, रेड्यांच्या टकरीजवळ प्रतिभानगर, कोल्हापूर येथील मतदान केंद्र क्र. 18, 19, 20, 21 वर तालुक्यातील मतदार मतदान करतील.

कागल : निर्णायक लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष 

कागल : येथील शाहू हायस्कूलमधील चार केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यातील कागल मतदान केंद्र संवेदनशील मानले जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार मतदान केंद्रांकरिता 28 कर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणुकीत तालुका केंद्रस्थानी आहे. कागल तालुक्यातीलच नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. एक पोलिस अधिकारी, 5 पोलिस कर्मचारी तसेच गस्त घालत असलेले पोलिस असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक भैयासाहेब माने, अनिलराव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे तसेच कागल तालुक्याशी संबंधित असलेल्या माजी खासदार निवेदिता माने, प्रदीप पाटील, कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव नवाळे यांच्या कन्या श्रुतिका शाहू काटकर हे उमेदवार आहेत. कागल तालुक्याच्या दृष्टीने ही निवडणूक राजकीयद़ृष्ट्या महत्त्वाची आणि भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणारी आहे. तालुक्यामध्ये इतर सेवा संस्था गटांमध्ये 473 पतसंस्था व नागरी बँका गटामध्ये 95 प्रक्रिया व मार्केटिंग गटांमध्ये 103, विकास सेवा संस्था गटांमध्ये 168 इतके मतदान आहे.

भुदरगड : पाटील-नांदेकर यांच्यात टक्कर !

गारगोटी : तालुक्यातील गारगोटी केंद्रशाळा येथील तीन मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी 23 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मतदान केंद्र क्रमांक 3 वर विकास सेवा संस्था गटातील 208 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. केंद्र क्रमांक 4 वर प्रक्रिया संस्था गटातील 26 व पतसंस्था गटातील 58 पतसंस्था मतदानाचा हक्क बजावणार आहेत. केंद्र क्रमांक 4 वर इतर गटातील 283 संस्थांचे ठरावधारक मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी 23 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

विकास सेवा गटात सत्ताधारी गटातून रणजितसिंह पाटील व विरोधी गटातून यशवंत नांदेकर यांच्यात लढत होत आहे. पत संस्था गटातून विरोधी आघाडीमधून प्रा. अर्जुन आबिटकर आपले मत आजमावत आहेत. दोन्ही आघाड्यांचे उमेदवार सहलीवर गेले होते. मंगळवारी सायंकाळी ते सहलीवरून परतले. त्यानंतर ठरावधारकांचा शपथ कार्यक्रम घेण्यात आला.

आजरा : 347 मतदार करणार मतदान 

आजरा ः तालुक्यात दोन केंद्रांवर मतदान होणार आहे. डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल येथे हे मतदान होणार आहे. सेवा संस्था गटातील 106 ठरावधारकांसह एकूण 347 मतदार मतदान करणार आहेत. आजरा तालुक्यात सेवा संस्थांसाठी अशोक चराटी व सुधीर देसाई यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. या गटात 106 ठरावधारक मतदान करणार आहेत. या गटातील मतदार गेले दोन महिने सहलीवर होते. दोनही उमेदवारांचे मतदार मतदानाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. तेथून ते गटागटाने मतदार केंद्रावर येणार आहेत. कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटात 9, पतसंस्था बँका गटातून 66 तर दूध संस्था आणि इतर गटातून 166 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राखीव गटातील पाच जागांसाठी तालुक्यातून एकूण 347 मतदार आहेत. मतदान केंद्रावर 20 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एका केंद्रावर सेवा संस्था गटाचे तर दुसर्‍या केंद्रावर उर्वरित मतदान होणार आहे.

शिरोळ : ना.यड्रावकर व पाटील यांच्यात लढत

शिरोळ : जिल्हा बँकेसाठी निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व गणपतराव पाटील यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यात सेवा संस्था गटाचे 149 मतदार आहेत. त्याचबरोबर इतर गटाचे असे एकूण 561 मतदार आहेत. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य बंद होणार आहे.

सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था निबंधक प्रेम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मतदानासाठी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या तीन खोल्या मतदान केंद्र म्हणून आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मतदान अधिकारी व सहा ते आठ या प्रमाणात इतर कर्मचारी अशी 24 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कडक पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

मतदान प्रक्रिया शिक्के मारून, रंगीत मतपत्रिकांद्वारे पार पडणार आहे. यात सेवा संस्था, गटातील 149, नागरी बँका व पतसंस्था गटात 114, कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटामध्ये 56 आणि इतर 242 असे एकूण 561 मतदानासाठी पात्र आहेत.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी बुधवारी (दि. 5) मतदान होत आहे. 12 तालुक्यांत एकूण 40 केंद्रांवर मतदान होत असून यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशासह मोबाईल वापराला बंदी असणार आहे. एकूण 15 अधिकारी, 110 पोलिस अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

मतदान केंद्राच्या ठिकाणी केंद्राध्यक्ष एकावेळी मतदारांना प्रवेश देण्याचे प्रमाण ठरवतील. त्या व्यक्ती मतदान करून बाहेर पडेपर्यंत दुसर्‍या व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही. मतदान अधिकारी, मतदान प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवारांचा प्रतिनिधी, दिव्यांग व्यक्ती व सोबत असणारी व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त कोणासही मतदान केंद्रात प्रवेश देता येणार नसल्याचेही पोलिसांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button