कोल्हापूर : ‘मोका’ संशयितांचा पोलिसांना चकवा! | पुढारी

कोल्हापूर : ‘मोका’ संशयितांचा पोलिसांना चकवा!

कोल्हापूर ; दिलीप भिसे : राजकीय हस्तक्षेप आणि संपत्तीच्या बळावर गुंडाराज निर्माण करणार्‍या मटकाकिंग सम्राट कोराणे, इचलकरंजीतील तेलनाडे बंधू आणि 7 राज्यांत मटका रॅकेट चालविणार्‍या पप्पू सावलासह टोळीचे कोल्हापूर पोलिसांनी कंबरडे मोडून काढले आहे. मात्र मोका अंतर्गत कारवाईच नव्हे, दोषारोपपत्र दाखल होऊनही दोन वर्षे संशयित मोकाट आहेत. मटकाबुकी सम्राट कोराणे, पप्पू सावलासह 37 गुन्हेगार अजूनही पोलिसांना चकवा देत आहेत.

राजकीय वरदहस्तामुळे कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा उदय झाला. काळ्या धंद्यातून कोट्यवधी रुपयांची माया जमू लागली. त्यातून गावगुंडांची फौज तयार करून त्याचा दहशतीचा वापर सुरू झाला. पैशाबरोबर आता राजकीय प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यातून किंग किंवा ‘किंगमेकर’ होण्यासाठी धडपड सुरू झाली. त्यातून सुरू झाली ईर्ष्या, दुश्मनी आणि जीवावर बेतणारे गॅगवॉर.

यंत्रणा हतबल

एकेकाळी इचलकरंजीसह परिसरातील सूत गिरणी कामगारांना रिक्षातून जेवणाचे डबे पोहोच करणार्‍या संजय तेलनाडेसह त्याच्या भावांकडे आठ-दहा वर्षांत श्रीमंती आली कोठून, हा संशोधनाचा विषय आहे. मटकाबुकी सलीम हिप्परगी याच्या खुनानंतर मटका उलाढालीची सारी सूत्रे तेलनाडे बंधूंच्या हातात आली. पाठोपाठ गुंडांची फौजही त्याच्या दिमतीला येऊ लागली. राजकीय आश्रयातून बघता बघता त्याचे साम्राज्य फोफावले. तेलनाडे बंधूंचे वाढते कारनामे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या कानावर पडूनही त्यांनी कानावर हात ठेवले. अगदी काल-परवापर्यंत तेलनाडेची उठबस पोलिस ठाण्यात अधिकार्‍यांच्या खुर्चीला खुर्ची लागूनच होती. फरार काळात अनेकांचे त्याच्याशी ‘कनेक्शन’ होते. त्यामुळेच तपास पथकातील हालचालीची इत्थंभूत माहिती त्याच्यापर्यंत पुरविण्यात येत होती.

तपास पथकच ढिम्म!

तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या काळात मोका अंतर्गत कारवाई झालेल्या टोळक्यांच्या शोधासाठी रात्रंदिवस ससेमिरा सुरू होता. तत्कालीन महिला पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी एकाच गुन्ह्यात 44 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करून त्यापैकी 42 जणांना तुरुंगात डांबले. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदलीनंतर मात्र ही शोधमोहीम थंडावली. मटकाबुकी सम्राट कोराणे याच्या ‘कोल्हापूर वारी’ची सतत दबक्या आवाजात चर्चा असते. मात्र कोल्हापूर पोलिसांना त्याचा सुगावा लागत नाही म्हणे..!

सावला टोळीचा म्होरक्या मोकाटच

मुंबईतील पप्पू सावलासह टोळीचे महाराष्ट्रासह 7 राज्यांत मटका रॅकेट कार्यरत होते. कोल्हापूर पोलिसांनी ’मुंबई मटका’ बंद पाडला असला तरी अन्य नावाने पुन्हा दुकानदारी सुरू झाली आहे. मुल्‍ला, सावला व कोराणे टोळीतील प्रमुख साथीदार जेरबंद झाले असले तरी सावला टोळीचा म्होरक्या प्रकाश ऊर्फ पप्पू सावला अद्यापही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. त्याचा पुत्र विरेल सावला पोलिसांच्या सापळ्यात सापडला आहे.

फरारी संशयित

मोका अंतर्गत कारवाई होऊनही प्रमुख फरारी संशयितांत सम्राट कोराणे (कोल्हापूर), सुनील तेलनाडे (इचलकरंजी), पप्पू सावला (मुंबई), हैदर ऊर्फ शब्बीर सरताज ऊर्फ सरदार इराणी, कासिम सलीम इराणी, मोहम्मद शौकत इराणी, मुस्लिम जाफरी इराणी (जयसिंगपूर) आणि किरण दुंडाप्पा माने यांचा समावेश आहे.

म्हणे, मानसिंग बोंद्रेचा छडा लागेना !

पंधरवड्यापूर्वी कोल्हापुरात बेछूट गोळीबाराचे प्रकरण गाजले. मानसिंग बोंद्रेसह साथीदार यदुनाथ यादव याच्यावरही गुन्हा दाखल झाला. यदुनाथला अटक झाली. मात्र मुख्य संशयित मानसिंग अजूनही राजवाडा पोलिसांच्या हाताला लागला नाही. म्हणे त्याचा सुगावा लागत नाही.

Back to top button