कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मी व बंटी अदानी-अंबानी नव्हे तर जनतेचे श्रावणबाळ | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मी व बंटी अदानी-अंबानी नव्हे तर जनतेचे श्रावणबाळ

वारणानगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) असताना केवळ शिवसेनेतील काहीजणांच्या हट्टापायी निवडणूक लादली आहे, असा आरोप करीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्ही अदानी-अंबानी नसून जनतेचे श्रावणबाळ व हमाल आहोत हे ध्यानात घ्यावे अशा शब्दात विरोधकांना ठणकावले. आपलेे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आमदार विनय कोरे यांनी पन्हाळा तालुक्यातील 242 ठरावधारकांपैकी 232 ठरावधारक उपस्थित असल्याने एकतर्फी विजयाचा दावा केला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( जिल्हा बँक निवडणूक ) छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या पन्हाळा तालुक्यातील मतदारांचा मेळावा शुक्रवारी वारणानगर येथे झाला. त्यावेळी मुश्रीफ व कोरे बोलत होते.

जिल्हा बँकेचा ( जिल्हा बँक निवडणूक ) शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज देण्यासाठी प्रयत्न राहील. शेतकरी विकासासाठी तरुणांना उद्योगधंद्यासाठी व इतर विविध कर्ज योजना राबविणार आहे.आमदार विनय कोरे यांनी सूचविलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न राहील, असे मुश्रीफ म्हणाले.

जिल्हा बँकेची निवडणूक ( जिल्हा बँक निवडणूक ) बिनविरोध व्हावी असे सर्वांचे मत असताना कुणीतरी राजकीय मतभेद व प्रतिष्ठेसाठी निवडणूक लादल्याचा आरोप कोरे यांनी केला. जिल्हा बँकेने स्वतःची विमा कंपनी स्थापन करून शेतकर्‍यांना कमी मोबादल्यात लाभ द्यावा. हॉलंडमधील रॅबो बँकेच्या धर्तीवर जिल्हा बँकेचा विस्तार करावा, असे सांगून कोरे यांनी येत्या तीन वर्षांत वारणा कारखाना जिल्हा बँकेचे सर्व कर्ज भागवणार असल्याचे सांगितले.

गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे व राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, पन्हाळ्याच्या सभापती वैशाली पाटील यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार, जिल्हा परिषद सदस्य, मतदार उपस्थित होते. अ‍ॅड. शाहू काटकर यांनी आभार मानले.

माझी व विनय कोरेंची मैत्री अटळ आहे. माझे गुरू आहेत….

माझी व विनय कोरे यांची गेली 22 वर्षे मैत्री आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही एकत्र आहोत. काही बाबतीत मी त्यांचा राजकीय सल्ला कायमपणे घेतो. मात्र काही बाबतीत ते माझे ऐकत नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.

अंबानी – अदानी कोण? ः कोरे

संजय मंडलिक यांनी केलेल्या टिकेचा संदर्भ देत विनय कोरे यांनी मुश्रीफ-बंटी यांच्याकडे पाहत अंबानी-अदानी कोण? असे विचारताच सभागृहात हंशा पिकला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर मी आणि आवाडे का? असा सवालही केला.

राजकारणविरहित बँकेसाठी प्रयत्न ः सतेज पाटील

जिल्हा बँकेत शेतकर्‍यांचा घामाचा पैसा असून ही बँक टिकविण्यासठी मुश्रीफ यांनी चांगले प्रयत्न केले. बँक राजकारण विरहीत असावी यासाठी यापुढेही प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

Back to top button