कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : हातमिळवणी, मांडवली अन् राजकीय हिशेब | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : हातमिळवणी, मांडवली अन् राजकीय हिशेब

कोल्हापूर; संतोष पाटील : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) निमित्ताने हातमिळवणी, मांडवली आणि राजकीय हिशेब चुकता करण्याचा खेळ सुरू झाला आहे. कोणी कोणाचा ‘गेम’ केला, कसा ‘करेक्ट’ कार्यक्रम झाला. आमदारकीची गणिते, लोकसभेच्या जोडण्या, कारखान्याचा मेळ, विधान परिषद निवडणुकीतील मानापमान, ‘गोकुळ’चा जय-पराजय आदी समोर ठेवूनच जोडण्या घातल्या जात आहेत. सिंगल व्होटिंगसाठी फिल्डिंग लावत राजकीय दंगलीतून सहिसलामत सुटण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) दोन्ही काँग्रेस आणि भाजपविरोधात शिवसेना असे वरवर लढतीचे चित्र आहे. मात्र, यातील अंतरंग आणि त्यातून उमटणारे राजकीय तरंग वेगळेच आहेत. काही ठिकाणी शांतपणे काटा काढण्याचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी या तरंगाच्या लाटा तालुक्याच्या राजकीय बुरुजांना धक्के देत आहेत. प्रत्येक गटातील लढतीची गणिते आणि तालुक्यातील घडामोडींचा पैलू स्वतंत्र आहे.

शिरोळ तालुक्यात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्या लढतीमागे येणारी आणि झालेली विधानसभेची बीजे आहेत. विधान परिषदेच्या जोडण्या आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील वर्चस्ववाद आहे. प्रक्रिया गटात खा. संजय मंडलिक आणि बाबासाहेब आसुर्लेकर यांच्यासाठी येथील जय-पराजय त्यांची भविष्यातील राजकीय दिशा अधिक स्पष्ट करणारा असेल. दोघेही संचालक म्हणून बँकेत आल्यास सत्ताधारी कारभार्‍यांनाही दिलासा देणारेच असेल, असाही एक मतप्रवाह आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मंडलिक आणि सरूडकर गट बॅकफुटवर गेला. विश्वास जाधव आणि स्मिता गवळी यांच्यातील लढत आणि जय-पराजय हे नेत्यांसाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत. बँक, पतसंस्था गटात आ. प्रकाश आवाडे, अनिल पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर असा तिरंगी सामना रंगला आहे. या गटात आश्चर्यकारक निकाल लावून कोणी तरी कोणाच्या तरी ‘करेक्ट’ कार्यक्रमाची जोडणी घालत असल्याची जोरात चर्चा आहे. महिला गटातील माजी खा. निवेदिता माने, श्रुतिका काटकर, रेखा कुराडे, लतिका शिंदे यातील थेट लढतीमध्ये निवेदिता माने यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. माने यांना शिवसेना सोडून सत्ताधार्‍यांसोबत जाण्याचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून द्यावे लागेल. काटकर यांचा विजय आ. पी. एन. पाटील यांचे संस्थात्मक वर्चस्व दाखवणारा ठरणार आहे. पी. जी. शिंदे यांना गगनबावडा तालुक्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी लतिका शिंदे यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

अडीच घरांचा खेळ ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

भाजपने दोन्ही काँग्रेससोबत जाणे, शिवसेनेने काडीमोड घेणे, बँकेच्या निवडणुकीतून सहिसलामत बाहेर पडून शिवसेनेला पुन्हा आपल्यासोबत आणण्यासाठी दोन्ही काँग्रेसची व्यूहरचना, निवडणुकीनंतर भाजपसोबत दोन्ही काँग्रेसचे राजकारण आदी घडामोडींमागे बुद्धिबळाच्या पटातील अडीच घरांचा खेळ रंगणार आहे. आता जिल्हा बँकेच्या पटावर जो बाजी मारेल, तोच जिल्ह्याच्या राजकारणात तग धरणार आहे.

Back to top button