कोल्हापूर : बँक खात्यातील रक्कम परस्पर काढल्याने खातेदार हवालदिल | पुढारी

कोल्हापूर : बँक खात्यातील रक्कम परस्पर काढल्याने खातेदार हवालदिल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बचत खात्यावरील मोठमोठ्या रकमा काढल्याचे एसएमएस एकाचवेळी अनेक खातेदारांच्या मोबाईलवर आल्याने बँक खातेदार हवालदिल झाले आहेत. शाहूपुरी येथील एक राष्ट्रीयीकृत बँक, शाहूपुरी पोलिस ठाण्यासह सायबर क्राईम शाखेकडे अनेक खातेदारांनी शुक्रवारी धाव घेतली. कोणतेही व्यवहार न करता खात्यावरील रकमा परस्पर कशा काढण्यात आल्या, असा सवाल हे खातेदार विचारत होते.

संबंधित राष्ट्रीयीकृत बँक व्यवस्थापनासह पोलिस यंत्रणेने या घटनेची दखल घेतली असून, एटीएम कार्ड ब्लॉक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले.

शाहूपुरी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील खातेदारांना त्यांच्या बचत खात्यातील मोठमोठ्या रकमा काढल्याचे एसएमएस मोबाईलवर आले. खातेदारांनी थेट बँकेचे शाहूपुरी येथील कार्यालय गाठून अधिकारी, कर्मचार्‍यांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. एटीएमचा वापर अथवा ओटीपी दिलेला नसताना खात्यावरचे पैसे काढलेच कसे, असाही त्यांनी सवाल केला. एकाचवेळी अनेक खातेदारांनी बँकेत गर्दी केल्याने अधिकारी, कर्मचारीही चक्रावले.

हा प्रकार एटीएम कार्ड क्लोनिंग करून झाला असावा का? याचीही चर्चा सुरू झाली आहे. संबंधित कार्ड ब्लॉक करण्याच्या सूचनाही कर्मचार्‍यांना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्याची पूर्तता करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा प्रकार एटीएम सेंटर व पॉस मशिनवरून केलेल्या व्यवहारांतून संशयिताने केला असावा, असा अधिकार्‍यांचा संशय आहे.

बँक खातेदारांना विमा संरक्षण असल्याने संबंधितांनी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करून रकमेची मागणी करावी, 60 दिवसांत परतावा देण्याची तरतूद असल्याचेही वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे बँक खातेदारांमध्ये संभ—मावस्था निर्माण झाली आहे.

Back to top button