कोल्हापूर : कोल्हापूरला विजेवर चालणार्या 100 बसेस लवकरच मिळणार आहेत. त्याची पूर्व तयारी म्हणून ताराबाई पार्क येथे चार्चिंग स्टेशन उभारले जाणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी 9 कोटी 86 लाख 96 हजार 637 रुपये मंजूर केले आहेत. येत्या तीन महिन्यांत हे चार्जिंग स्टेशन पूर्ण होणार असून त्यानंतर विजेवर चालणार्या बससेवा वाढणार आहेत. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार असून डिझेलच्या खर्चातही बचत होणार आहे.
* ताराबाई पार्क येथे उभारले जाणार स्टेशन
* 100 इलेक्ट्रिक बस येणार
* तीन महिन्यांत चार्जिंग स्टेशन पूर्ण होणार
इंधनाची बचत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्वी जेथे एसटीचा डेपो होता त्याच ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून ते मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ आहे.
परिवहन मंडळाच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-बसेसची सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसेसच्या चार्जिंगसाठी राज्यातील 10 एसटी स्थानकांमध्ये 50 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. तसेच ई बसेसना प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. मोठ्या संख्येने प्रवासी या बसेसने प्रवास करत आहेत.
कोल्हापुरात ताराबाई पार्क येथील एसटी कॉलनी आवारात ई बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी स्वतंत्र डेपो व चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली. ई बसेससाठी चार्जिंग पॉईंटसाठी 11, 22 व 33 के. व्ही. क्षमतेची उच्च दाबाची वीजजोडणी आवश्यक असते. एका बसला चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तास लागतात. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बस 300 किलोमीटरचा टप्पा गाठते.