कोल्हापूर : उपर्‍यांना उमेदवारी नको; पक्षवाढीला महत्त्व द्या | पुढारी

कोल्हापूर : उपर्‍यांना उमेदवारी नको; पक्षवाढीला महत्त्व द्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेची ( kolhapur district bank election ) रणधुमाळी सुरू असून, इच्छुकांनी उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी काँग्रेस कमिटीत पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 38 इच्छुक मुलाखतीस उपस्थित होते. ‘उपर्‍यांना उमेदवारी नको. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य, पण काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असणार्‍यांनाच उमेदवारी द्या,’ अशा भावना उमेदवारांसह उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केल्या. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, शहराध्यक्ष सचिन चव्हाण उपस्थित होते.

तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांची ( kolhapur district bank election ) संख्या अधिक असल्याने पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांनी इच्छुक आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत मुलाखती घेतल्या. इच्छुकांनी ठरावधारकांसह शक्‍तिप्रदर्शन केले. पन्हाळा तालुक्यातील इच्छुकांसह कार्यकर्ते नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देत काँग्रेस कमिटीत आले. दुपारी मुलाखती झाल्यानंतर पालकमंत्री पाटील आणि आमदार पी.एन.पाटील यांची बंद खोलीत सुमारे पाऊण तास चर्चा झाली.

छापील उत्तरांचा खेळ ( kolhapur district bank election )

साहेब, तालुक्यात काँग्रेस वाढली पाहिजे, बळकट झाली पाहिजे म्हणून उमेदवारीची मागणी करत असल्याचे बहुतांश इच्छुकांनी सांगितले. प्रमुख नेत्यांची बैठक होईल. त्यात उमेदवारीचा निर्णय होईल, असे छापील उत्तर नेत्यांकडून मिळत होते. समोरील उमेदवाराच्या संस्थात्मक ताकदीचा अंदाज नेत्यांना असल्याने कोणत्या गटातून उमेदवारीची मागणी केली आहे, असा एकच प्रश्‍न नेते विचारत होते.

म्हणजे जिल्हा माझ्या विचाराने निघाला ( kolhapur district bank election )

काँग्रेस वाढली पाहिजे, असे उमेदवार आवर्जून सांगत होते. यावर आमदार पी. एन. पाटील यांनी, काँग्रेस वाढली पाहिजे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. तेच सर्वजण सांगत आहेत. याचा अर्थ जिल्हा माझ्या विचाराने वाटचाल करत आहे, अशी मिश्कील टिपणी आ. पी. एन. पाटील यांनी केली.

पडेल तो स्वीकृत नाही ( kolhapur district bank election )

शिरोळ तालुका संस्था गटातून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यापैकी एकाने माघार घ्यावी. जो माघार घेईल त्यास स्वीकृत संचालक केले जाईल, असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी माघार घेतली तरच स्वीकृतचा प्रस्ताव आहे, लढून हरल्यानंतर स्वीकृत केले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

यांनी दिल्या मुलाखती

ओबीसी – राजू काझी, सदाशिव चरापले, हिंदुराव चौगले, नीलेश जाधव-सरनाईक, पांडुरंग धुंदरे, संभाजी पाटील, मल्‍लिकार्जुन मुगेरी, जयवंतराव शिंपी.

विशेष मागास गट – अशोक खोत, विजयकुमार पाटील, विनायक पाटील, सदाशिव गोपळकर, बबन रानगे, लक्ष्मण रानगे, स्मिता गवळी, मुकुंद पोवार.

अनुसूचित जाती, जमाती गट – राजू आवळे, दिनकर कांबळे, विजय पोळ, निवृत्ती सातपुते.

महिला गट – उदयानी साळुंखे, रेखा कुराडे, स्मिता गवळी, वैशाली घोरपडे, सविता पाटील, श्रुतिका काटकर.

इतर शेती संस्था – बाबासो आरबोळे, राजू काझी, सुरेश कुराडे, अशोक खोत, विजयसिंह मोरे.

बँका, पतसंस्था – नीलेश जाधव-सरनाईक.

Back to top button