कोल्हापूर : शिवसेनेचा सन्मान होणार की बोळवण? | पुढारी

कोल्हापूर : शिवसेनेचा सन्मान होणार की बोळवण?

कोल्हापूर; विकास कांबळे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ( kolhapur district bank election ) सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळाची भाषा केली होती. परंतु; स्थानिक पातळीवरील राजकारण पाहता शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांनाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा संधी मिळणार असल्याने आपल्या कार्यकर्त्यांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेच्या अन्य नेत्यांचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवसेनेचा सन्मान होणार की बोळवण? हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक( kolhapur district bank election ), दूध संघ, सहकारी साखर कारखाना आदी सहकारी संस्थांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व असायचे. काँग्रेसला भाजप, शिवसेना यांसारखे सक्षम विरोधी पक्ष पुढे आले. त्यामुळे वर्षानुवर्ष काँग्रेस आणि नंतर स्थापन झालेल्या राष्ट्रवादीमध्ये राहून संधी मिळत नसल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना शिवसेना, भाजपच्या रुपाने सक्षम पर्याय मिळाला. ते त्या पक्षाकडे आकृष्ट होऊ लागले. त्यांची ताकद त्या त्या क्षेत्रापुरती मर्यादित असली तरी सहकारी संस्थांच्या राजकारणात प्रस्थापितांना ती अडचणीची ठरत असते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी जमवून घेण्यास सुरुवात केली. राज्यातदेखील राजकीय आगतिकतेमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडी स्थापन करत सरकार आले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निडणुकीबाबत ( kolhapur district bank election ) सध्या त्याचदृष्टीने राजकारण सुरू आहे. जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथम बिनविरोधची चर्चा सुरू झाली. निवडणूक बिनविरोध करावयाची झाल्यास सर्वांना सोबत घ्यावे लागते. त्यातूनच भाजपला मानणारे न मानणार्‍यांसह जिल्ह्यातील सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे.

शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांनी यासंदर्भात कोल्हापुरात बैठक घेतली. बैठकीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास शिवसेना स्वबळावर लढेल, असा इशारा दिला होता. त्यावेळी त्यांना किती जागा अपेक्षित आहेत किंवा सन्मानजनक जागेचा निकष काय असेल, असे विचारले असता त्यांनी त्यावर बोलण्याचे टाळले. सध्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, कोणाला किती जागा यावर दोन दिवसांत शिक्‍कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील 12 जागांविषयी काही वाद नाही. या गटातील निवडणुका उमेदवारांच्या ताकदीवर होत असतात. राहिलेल्या 9 जागांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य शक्‍ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आ. प्रकाश आवाडे यांच्यात वाटप होणार आहे. जागांची संख्या पाहता तीनपेक्षा अधिक जागा कोणालाच मिळणार नाहीत. शिवसेनेचे सध्या गटातील दोन संचालक आहेत. याशिवाय आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. चंद्रदीप नरके आपल्या कार्यर्त्यांसाठी आग्रही आहेत. तसेच संग्रामसिंह कुपेकर देखील इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेनेला अपेक्षित सन्मानजनक तोडगा निघणार काय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button