कोल्हापूर जिल्‍हा बँक निवडणूक : यादी ठरली... इच्छुक गॅसवर | पुढारी

कोल्हापूर जिल्‍हा बँक निवडणूक : यादी ठरली... इच्छुक गॅसवर

कोल्हापूर; संतोष पाटील : एक-दोन जागा वगळता सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलचा आराखडा तयार आहे. शिवसेनेला दोनपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. आ. विनय कोरे यांचा विरोध मावळण्याची शक्यता आहे. तालुक्यातील 12 जागांवरील उमेदवार ठरलेले आहेत. उर्वरित नऊ जागांवर तडजोड करताना नेत्यांनी भविष्यातील राजकारणाच्या जोडण्या घातल्या आहेत. त्यामुळेच जिल्हा बँकेसाठी ( kolhapur district bank election ) मातब्बर इच्छुकांचा हिरमोड होणार असून, सव्वादोनशे इच्छुक गॅसवर आहेत.

गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड  ( kolhapur district bank election ) झाली आहे. शाहूवाडीतून सर्जेराव पाटील-पेरिडकर की मानसिंग गायकवाड आणि शिरोळमधून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर की काँग्रेसचे गणपतराव पाटील ही दोन नावे निश्चित होणे बाकी आहे. उर्वरित नऊ जागांवरील सत्ताधारी आघाडीतील उमेदवारांची नावे निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले. कागल तालुक्यातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, करवीरमधून आ. पी. एन. पाटील, भुदरगड तालुक्यातून के. पी. पाटील, राधानगरीतून ए. वाय. पाटील, हातकणंगले तालुक्यातून माजी आमदार महादेवराव महाडिक किंवा अमल महाडिक, पन्हाळा तालुक्यातून आ. विनय कोरे, आजरा तालुक्यातून अशोक चराटी, चंदगड तालुक्यातून आ. राजेश पाटील, गडहिंग्लजमधून संचालक संतोष पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक यांची उमेदवारी ( kolhapur district bank election ) ठरलेली आहे. पडद्यामागील घडामोडींनंतर संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर किंवा त्यांच्या पत्नी उमेदवार म्हणून निश्चित होतील. या गटातून प्रदीप पाटील यांच्यासाठी आ. विनय कोरे आग्रही आहेत. महिला गटात माजी खासदार निवेदिता माने यांचे नाव निश्चित आहे. संचालिका उदयानी साळुंखे यांच्या नावावर काँग्रेसकडून आग्रह कायम राहण्याची शक्यता आहे.

पतसंस्था आणि बँक गटातून आ. प्रकाश आवाडे ( kolhapur district bank election ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा, असा आग्रह आ. विनय कोरे आणि आ. पी. एन. पाटील यांनी केल्याचे ना. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या गटातील संचालक अनिल पाटील आणि प्रा. जयंत पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे. प्रा. अर्जुन आबिटकर यांनी जोरदार तयारी केल्याने या गटातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. अनुसूचित जाती गटातून काँग्रेसचे आ. राजू आवळे, इतर शेती संस्था गटातून राष्ट्रवादीचे संचालक भैया माने यांचे नाव निश्चित मानले जाते. ओबीसीतून संचालक असिफ फरास, विलासराव गाताडे, जयवंतराव शिंपी, अशोक चराटी, प्रदीप पाटील आदी डझनभर इच्छुकांत रस्सीखेच सुरू आहे. विशेष मागास प्रवर्गातून संचालक आर. के. पोवार आणि अप्पी पाटील, संदीप कारंडे, लक्ष्मण रानगे आदींनी फिल्डिंग लावली आहे.

शिवसेनेत सर्वाधिक अस्वस्थता ( kolhapur district bank election )

गोकुळ दूध संघाप्रमाणे शिवसेनेला जिल्हा बँकेतही वाटा हवा आहे. शिवसेनेने किमान चार जागांची मागणी केली आहे. मात्र, खा. संजय मंडलिक आणि माजी खा. निवेदिता माने या दोघांनाच शिवसेना म्हणून संधी मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आ. चंद्रदीप नरके यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

Back to top button