इंडो-रोमन व्यापाराच्या पाऊलखुणा कोल्हापूर-सांगली परिसरात | पुढारी

इंडो-रोमन व्यापाराच्या पाऊलखुणा कोल्हापूर-सांगली परिसरात

कोल्हापूर; सागर यादव : कोल्हापूर-सांगली परिसरात इंडो-रोमन व्यापाराच्या पाऊलखुणा मिळाल्या आहेत. इसवी सन पूर्व इंडो-रोमन व्यापाराचा संबंध सांगणार्‍या पाऊलखुणा कोल्हापूर व सांगली परिसरात आढळल्या आहेत.

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकातील ‘क्रेट कॉईन’वर कोरण्यात आलेल्या चिन्हांच्या प्रतिकृती महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी मार्गावर आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत.

पुरातत्त्वीय संशोधनांतर्गत कोल्हापुरातील पुरातत्त्वीय अभ्यासक सचिन भगवान पाटील यांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून डेक्‍कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून याबाबतचे सखोल संशोधन केले आहे. त्यांच्या या विषयाचा शोधनिबंध नुकताच लंडन येथील “CAERDROIA” The Journal of Maze and Labyrinth या 50 व्या रौप्यमहोत्सवी मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे.

जगातील निवडक 9 संशोधनांमध्ये प्रथम दर्जा देऊन हा शोधनिबंध प्रकाशित ई-मॅगझिनमधून अभ्यासकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

लवकरच या मॅगझिनची छापील प्रत (प्रिंटेड कॉपी) बाजारात उपलब्ध होणार आहे.

सचिन पाटील यांनी डेक्‍कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट अँड डिम्ड युनिव्हर्सिटी येरवडा, पुणे येथे पुरातत्त्व शाखा विभागप्रमुख डॉ. पी. डी. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडो-रोमन व्यापारासंदर्भातील पाऊलखुणांचे हे संशोधन केले आहे.

व्यापारसंबंधांवर प्रकाश टाकणारी चिन्हे

इंडो-रोमन व्यापारी संबंध सांगणार्‍या पाऊलखुणा ऐतवडे बुद्रुक व वशी (ता. वाळवा) तसेच मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) या सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये आहेत.

याला स्थानिक लोक ‘कोडे’ असे संबोधतात.

याशिवाय यापूर्वी या कोड्याला ‘चक्रव्यूह, सुरक्षा कोडे, मानचक्र, यमद्वार’ अशी अनेक नावे देण्यात आली आहेत.

या परिसरात सापडलेल्या चिन्हांप्रमाणे हुबेहूब चिन्हे रोमनच्या ‘क्रेट कॉईन’वर पाहायला मिळतात.

यावरून इंडो-रोमन व्यापाराला दुजोरा मिळत असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील यासंदर्भातील पाऊलखुणा शोधण्याचे काम सुरू आहे.

लवकरच शोधकार्य पूर्ण करून यासंदर्भातील पुढील पुरातत्त्वीय संशोधन लवकरच प्रकाशात आणण्याचा सचिन पाटील यांचा मानस आहे.

Back to top button