कोल्हापूर : ऑक्सिजनसाठी २०५ कोटींची तरतूद; आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती | पुढारी

कोल्हापूर : ऑक्सिजनसाठी २०५ कोटींची तरतूद; आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ऑक्सिजनसाठी २०५ कोटींची तरतूद केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जिल्ह्यातील 17 ऑक्सिजन प्लँट जुलैअखेर कार्यान्वित होतील, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

हे प्लँट तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. कारण, काही राज्यांत तिसरी लाट सुरू झाल्याचे दिसत आहे. तिसर्‍या लाटेत ऑक्सिजनची गरज अधिक प्रमाणात भासू शकते. ऑक्सिजनसाठी एसडीआरएफच्या माध्यमातून 205 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

तिसर्‍या लाटेत राज्याला दिवसाला साडेतीन हजार टन ऑक्सिजन लागेल, असा अंदाज आहे. दुसर्‍या लाटेत 1700 टन ऑक्सिजन लागत होता. तिसर्‍या लाटेत दुपटीपेक्षा अधिक ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना ऑक्सिजन प्लँटचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगून मंत्री टोपे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जनजागृतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उपचारासाठी एक हजार 222 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. राज्यातील म्युकर मायकोसिस आजाराच्या 9046 रुग्णांपैकी 5455 रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयांचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट

राज्याच्या आरोग्य विभागात कालबाह्य झालेल्या एक हजार रुग्णवाहिका होता. त्या सर्व रुग्णवाहिका बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गतसाली 500 रुग्णवाहिका आरोग्यसेवेत आल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आणखी 500 रुग्णवाहिकांसाठी 78 कोटी रुपये मंजूर केले आहेत. महिन्याभरात त्या रुग्णवाहिका सेवेत येतील, असे टोपे यांनी सांगितले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी निधीची व्यवस्था केली आहे.

अतिरिक्‍त लसीची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, गर्दी होईल असे कार्यक्रम करू नयेत, ज्या राज्यात पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे, त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना दिल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही आणखी वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्राकडे अतिरिक्‍त लसीची मागणी केली आहे, असे टोपेम्हणाले.

कंटेन्मेंट झोन कडक आवश्यक

केंद्रीय समिती येऊन गेली. त्यांनी काही सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आम्ही करत आहे.आरटीपीसीआर, अँटिजेन तपासणीचे प्रमाण केंद्र शासनाने 70/30 असे सांगितले आहे. सध्या आरटीपीसीआर 75 आणि अँटिजेन तपासणी 25 टक्के केली जात आहे. ही समाधानाची बाब आहे.

कंटेन्मेंट झोन अधिक कडक करणे महत्त्वाचे आहे. लसीचे दोन डोस घेऊनही कोरोनाबाधित झालेले काही नागरिक आढळले आहेत. त्याची असे रुग्ण 2 ते 4 टक्के आहेत. या बाधितांचे वय, आजार, लस घेतल्यानंतर किती दिवसांनी तो बाधित आढळला, व्हायरसने गुणधर्म बदलला आहे का, याची सविस्तर माहिती घेण्याची सूचना टोपे यांनी आरोग्य विभागाला दिली.

आरोग्य विभागातील100 टक्के जागा भरणार

आरोग्य विभागात अनेक जागा रिक्‍त आहेत. त्या त्वरित भरल्या जाणार आहेत. गेल्या आठवड्यात एक हजार डॉक्टरांच्या जागा भरल्या आहेत.

या आठवड्यात आणखी एक हजार डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. डॉक्टर नाहीत म्हणून उपचार नाहीत, असे महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात यापुढे होणार नाही. गट क आणि गट ड मधील 10 हजार पदांची भरती प्रक्रिया येत्या आठवड्याभरात सुरू होईल. दोन महिन्यांत आरोग्य विभागातील सर्व रिक्‍त पदे भरली जाणार आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

इंडस्ट्रीजमधील सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण गरजेचे

तिसरी लाट आली, तरी इंडस्ट्रीज बंद राहू नये. सर्व इंडस्ट्रीज मालकांनी कामगारांचे लसीकरण करून घेतले पाहिजे. त्यासाठी सीएसआर फंड लसीकरणासाठी वापरण्याचे नियोजन त्यांनी करावे. त्यामुळे कोरोना संसर्गापासून कर्मचार्‍यांचा बचाव शक्य आहे. उद्योग सुरू राहून अर्थचक्र सुरळीत सुरू राहील, यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी सूचनाही मंत्री टोपे यांनी केली.

कोल्हापूरची स्वॅब तपासणी पुण्यात होणार

मुंबई येथील थायरो केअर लॅबमधून स्वॅब अहवाल येण्यास 3 ते 4 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे उपचारास विलंब होतो. रुग्णास स्वॅब अहवाल वेळेत मिळावा, यासाठी पुणे येथे विशेष बाब म्हणून एनआयव्ही, ससून रुग्णालय येथे कोल्हापुरातील रुग्णांचे स्वॅब तपासा, अशी सूचना केली आहे. केंद्रीय पथकाने प्रत्येक रुग्णाचे सीटीस्कॅन करू नये, अशी सूचना केली आहे.
त्यामुळे गरजेप्रमाणेच रुग्णांची सीटीस्कॅन व अन्य चाचण्या करा, असेही टोपे यांनी सांगितले.

सेंट्रल सॉफ्टवेअरवर मिळणार बेडसह औषधांची माहिती

कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारांची माहिती त्वरित मिळावी, यासाठी सेंट्रल सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरवर बेड, औषधांसह वैद्यकीय उपचारांची सविस्तर माहिती मिळणार आहे. त्याचे लॉचिंग झाले आहे. याचा उपयोग सामान्य नागरिकांना होईल, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

Back to top button