कोल्हापूर : शहरात भरवस्तीत असलेल्या बिंदू चौक सबजेल (शहर व जिल्हा कारागृह)चे पद्माळा येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. या कारागृहाच्या नव्या इमारतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तब्बल 85 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
कारागृह प्रशासनाने पद्माळा येथील ‘कैद्यांची शेती’ या नावाने ओळखल्या जाणार्या परिसरात स्थलांतरच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गृह विभागाने पाहणी करून या जागेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रस्तावास गती मिळणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शहराबाहेर उभारण्यात आलेले बिंदू चौक सबजेल आता वाढत्या नागरीकरणामुळे मध्यवस्तीत आले आहे.
सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून राज्य शासनाने कारागृह परिसरात दीडशे मीटरपर्यंतच्या क्षेत्रात नव्याने बांधकामास नियमावली करून जबर अटीही घातल्या आहेत. त्यामुळे या परिसरात ठरावीक उंचीपर्यंतच बांधकामास परवानगी मिळते. अशा मर्यादित उंचीपर्यंतच्या बांधकाम परवानगीसाठी कारागृह विभाग, जिल्हा पोलिस दल व महापालिका अधिकार्यांच्या संयुक्त समितीची परवानगी लागते.
त्यामुळे बिंदू चौक सबजेल परिसरात नव्याने बांधकामाच्या परवानगीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सबजेलमध्ये सध्या 147 कैदी आहेत. जेल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिंदू चौक जेल शहराच्या मध्यवस्तीत आले आहे.
जवळच अंबाबाई मंदिर आहे. मंदिरात रोज हजारो भाविक भेट देत असतात. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. परिणामी, जेल शहराबाहेर हलविण्याविषयी तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांबरोबर चर्चा झाली असून, त्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.
सबजेलची क्षमता 125 कैद्यांची असून, सध्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 180 कैदी आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे सबजेल अपुरे पडत आहे. क्षमतेपेक्षा जास्त आरोपी असल्याने सुरक्षेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येतो. त्यामुळे नव्या कारागृहाची नितांत गरज असल्याचे सांगण्यात येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात गुन्हेगारांना किल्ल्यात कोंडून ठेवण्यात येत होते. 1847-48 मध्ये 12 हजार रुपये खर्चून बिंदू चौक येथे कोल्हापुरातील पहिले कारागृह बांधण्यात आले. 1873 मध्ये आणखी 12 हजार रुपये खर्चून मुख्य इमारतीच्या उत्तरेस दुमजली इमारत बांधली. इमारत अपुरी पडू लागल्यामुळे 1948 साली कळंबा येथे कारागृह बांधण्यात आले. तसेच 1942 मध्ये कोल्हापुरात सोनतळी कॅम्प नावाचे दुय्यम कारागृह स्थापन करण्यात आले. परंतु, 1952 मध्ये हे कारागृह बंद करण्यात आले.