District Bank Election : ‘बिनविरोध’च्या अडचणीत वाढ | पुढारी

District Bank Election : ‘बिनविरोध’च्या अडचणीत वाढ

कोल्हापूर ; विकास कांबळे : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या (District Bank Election) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्याच्या उमेदवारीला जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे प्रमुख आ. विनय कोरे यांचा विरोध, तर दुसरीकडे आ. कोरे आग्रह धरत असलेल्या उमेदवाराला पालकमंत्री सतेज पाटील यांचा थेट विरोध आहे. अशी परिस्थिती असल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघारीपर्यंत अनेक घडामोडी पाहावयास मिळणार आहेत.

जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नेत्यांच्या जोर, बैठका सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना सहकाराबद्दल प्रचंड तळमळ, आस्था आणि काळजी आहे. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी सर्व नेते सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आपले पक्षीय अभिन्वेश बाजूला ठेवून एकत्र येतात. एकत्र येत असताना देखील जिल्हा सहकारी बँकेसारख्या सहकारी संस्थेत अगोदर आपली जागा सुरक्षित करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यानंतर कार्यकर्त्यांसाठी त्यांचा आग्रह सुरू होतो. (District Bank Election)

तालुक्यातून निवडून द्यावयाच्या विकास संस्था गटातून शिरोळ वगळता बहुतांशी नेत्यांची बिनविरोध निवडणूक निश्‍चित मानले जाते. उर्वरित जागादेखील बिनविरोध करण्याचा नेत्यांचा प्रयत्न होता. परंतु, इच्छुकांची संख्या अधिक आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांचाच विरोध असल्यामुळे यात अडचणी असल्याने बँकेची संपूर्ण निवडणूक बिनविरोध होणे शक्य नाही, असे नेत्यांनी वारंवार बोलूनदेखील दाखविले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. प्रकाश आवाडे, आ. विनय कोरे हे प्रमुख नेते आहेत. एका गटामध्ये मंत्री मुश्रीफ आपल्या एका जवळच्या कार्यकर्त्यासाठी आग्रही आहेत. परंतु, तेवढ्याच ताकदीने या कार्यकर्त्याला आ. विनय कोरे विरोध करत आहेत. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यामध्ये काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. आ. कोरे आपल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यासाठी आग्रही आहेत.

कोणत्याही परिस्थितीत त्यांना जिल्हा बँकेत संचालक म्हणून घ्यायचे आहे. परंतु, पालकमंत्री सतेज पाटील यांचा आ. कोरे यांच्या उमेदवाराला विरोध आहे. आ. प्रकाश आवाडे हेदेखील एक गटातून निवडणूक रिंगणात उतरणात आहेत. हातकणंगले तालुक्यातून महाडिक यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्याने तर मंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपच्या कार्यकर्त्याने उमेदवारी दाखल केली आहे. शिरोळमध्ये राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर की गणपतराव पाटील वाद सुरूच आहे.

बिनविरोधसाठी नेत्यांची कसरत (District Bank Election)

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोधसाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना ओबीसी गटामधून चार ते पाच विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

दोन दिवसांत नेत्यांच्या बैठकांचा उडणार धुरळा (District Bank Election)

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आठवड्यात नेत्यांच्या बैठकांचा धुरळा उडणार आहे. कोणत्या गटातून कोण लढणार? आघाडीसह नेत्यांना जागा वाटपात किती जागा मिळणार? प्रमुख गटातील माघारीसह पाठिंब्याची जबादारी आदी प्रमुख मुद्द्यांवर नेत्यांची चर्चा होणार आहे. नेत्यांच्या बैठक आणि चर्चेनंतरच माघारीला वेग येणार आहे.

आघाडीतील नेत्यांना या बैठकीबाबत बुधवारी (दि. 7) निरोप दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारनंतर (दि. 8) पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापुरात येतील. यानंतर प्रमुख नेत्यांच्या बैठका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पालकमंत्री सतेज पाटील, ना. हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, खा. संजय मंडलिक यांच्यात बैठक होईल. यानंतर आघाडीत समाविष्ठ होणार्‍या इतर नेत्यांसोबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

बैठकांच्या फेर्‍यानंतरच पॅनेल आकार घेईल. प्रक्रिया गट, बँका आणि पतसंस्था गट, महिला गट, तसेच राखीव गटासह चार विकास संस्था गटातील उमेदवारी आणि माघारीबाबत नेत्यांच्या बैठकीत उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. नेत्यांच्या बैठकीनंतर उमेदवारी किंवा माघारीसाठी निरोप येणार असल्याने इच्छुकांच्या नजरा या बैठकांकडे लागल्या आहेत.

Back to top button