कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी २२६ पात्र उमेदवार | पुढारी

कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी २२६ पात्र उमेदवार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची सोमवारी छाननी झाली. त्यात 368 अर्जांपैकी 123 दुबार अर्ज रद्द करण्यात आले. 19 जण अपात्र ठरले. आता निवडणुकीत 226 उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 21 डिसेंबरपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे.

अर्जांची छाननी निवडणूक

निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्यासमोर पूर्ण झाली. सकाळी 11 वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात छाननीला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजता ती संपली. गटनिहाय छाननीसाठी नेटके नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिस्तबद्धरीत्या प्रक्रिया पार पडली. प्रथम दुबार 123 उमेदवारांची नावे बाजूला करण्यात आली.

त्यानंतर दुपारी दोनपासून अपात्र ठरलेल्या उमेदवारांची सुनावणी अरुण काकडे यांच्या पुढे झाली. यावेळी उमेदवार कागदपत्रे आणि वकिलांसह हजर होते. सुनावणीची प्रक्रिया सुमारे दोन तासांत संपली. यानंतर काकडे यांनी 19 उमेदवार अपात्र ठरल्याचे जाहीर केले. दरम्यान, पात्र 226 उमेदवारांची यादी मंगळवारी 11 वाजता बँकेच्या निवडणूक कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.

…हे ठरले अपात्र

सोमनाथ विनायक पाटील यांचा निवडणूक अर्ज अपात्र ठरला. विनायक ऊर्फ अप्पी पाटील बँकेचे उपाध्यक्ष होते. तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. पाटील थकबाकीदार असल्याने गडहिंग्लज सेवा संस्था आणि विशेष मागासवर्गीय गटातील त्यांचे सर्व अर्ज रद्द ठरवण्यात आले.

दौलत कारखान्याच्या थकबाकीमुळे गोपळराव पाटील आणि संजय जाधव यांचा अर्ज अपात्र ठरला. हातकणंगले सेवा संस्था गटातील संभाजी मोरे, करवीर संस्था गटातील अनिल राऊसाहेब पाटील, राधानगरीतील रमेश वारके हेही थकबाकीमुळे अपात्र ठरले.

सूचक आणि अनुमोदक यांनी अर्जावर सही न केल्याने सदाशिव नवणे अपात्र ठरले. इतर संस्था गटातून अशोक जाधव, महिला गटातून रेखाताई पाटील, अनुसूचित जाती-जमाती गटातून निवृत्ती सातपुते, सुभाष देसाई, श्रीमंत बामणे आणि अमित कांबळे यांचे अर्जही अपात्र ठरले. तर ओबीसीमधून रवींद्र कामत, सदाशिव पोपळकर, राहुल दिलीप पाटील आदींचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले.

Back to top button