कोल्हापुरात ‘बटण-बुलेट’ची झिंग!

कोल्हापुरात ‘बटण-बुलेट’ची झिंग!
Published on
Updated on

[author title="सुनील कदम" image="http://"][/author]

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील तरुणाईमध्ये नशिल्या गोळ्या सेवनाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचताना दिसत आहे. प्रामुख्याने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये या 'बटण किंवा बुलेट' नावाने मिळणार्‍या गोळ्यांचे भलतेच आकर्षण दिसत आहे. अनेक गुन्हेगार या गोळ्यांच्या आहारी गेले असून, या नशेतच त्यांच्याकडून गंभीर गुन्हे घडत आहेत.

नशिल्या गोळ्यांचे मूळ!

मनोरुग्ण, भाजलेले रुग्ण, रेबीज, मेंदूविकार, निद्रानाश, श्वसनविकार, तीव्र स्वरूपाच्या वेदना इत्यादी आजारांच्या रुग्णांसाठी जी औषधे वापरण्यात येतात, त्यांपैकीच काही गोळ्यांचा वापर हा नशाखोरीसाठी होताना दिसत आहे. या ज्या काही गोळ्या आहेत, त्या खुल्या बाजारात मिळत नाहीत. प्रमाणित डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे विकण्यास बंदी आहे. शिवाय अशा गोळ्यांच्या खरेदी-विक्रीच्या सगळ्या नोंदी ठेवण्याचेही औषध दुकानदारांना बंधनकारक आहे. असे असताना काळ्या बाजारातून या गोळ्या खुल्या बाजारात येताना दिसत आहेत.

असा होतो परिणाम

या गोळ्यांच्या सेवनामुळे मेंदूच्या सजगतेवर परिणाम होतो. मनातील सर्व प्रकारची भीती गायब होते, रागाचा पारा चढतो आणि भले-बुरे काहीही न बघता माणूस काहीही म्हणजे काहीही करायला सज्ज होतो. त्यामुळे आजकाल बहुतांश गुन्हेगार कोणताही गुन्हा करण्यापूर्वी या नशिल्या गोळ्यांचे सेवन करताना दिसत आहेत. या गोळ्यांना कोणत्याही स्वरूपाची चव किंवा वास नसल्यामुळे एखाद्याने त्याचे सेवन केल्याचे समजूनच येत नाही. त्यामुळे आजकाल गुन्हेगारांप्रमाणेच तरुणाईतही या नशिल्या गोळ्यांची क्रेझ आहे.

गोळ्यांचे उगमस्थान

या नशिल्या गोळ्या प्रामुख्याने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून इथे येत असल्याचे पाहायला मिळते. त्या राज्यांमध्ये औषध कंपन्यांच्या नावाखाली नशिल्या गोळ्या आणि पावडर तयार करणार्‍या अनेक कंपन्या आढळून आल्या आहेत. या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या गोळ्या शहरात आणि जिल्ह्यात येतात. राज्यातीलही काही बोगस औषध कंपन्या या 'गोरखधंद्या'त गुंतलेल्या आहेत. त्या माध्यमातून नशिल्या गोळ्या विनासायास उपलब्ध होऊ लागल्या आहेत. साधारणत: तीनशे ते चारशे रुपयांना दहा गोळ्यांचे पाकीट विकले जात आहे.

आवर घालण्याची गरज

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात फैलावत चाललेल्या या नशिल्या गोळ्यांच्या बाजाराला कठोर उपाययोजना करून आळा घालण्याची गरज आहे; अन्यथा समाजाला ते परवडणारे नाही, कारण जिल्ह्यातील तरुणाईचा 'उडता पंजाब' होण्याची स्पष्ट चिन्हे काही ठिकाणी आतापासूनच दिसू लागली आहेत.

अन्न-औषध प्रशासन आणि पोलिस गाफील!

'बटण किंवा बुलेट' या नावाने अनेक ठिकाणी या गोळ्यांची चोरीछुपे विक्री चालते. गावाबाहेरच्या सुनसान जागा, नदीकाठ, काही ढाबे, महाविद्यालयीन परिसर, काही पानटपर्‍या आदी ठिकाणी या गोळ्या मिळताना दिसतात. अनेक परप्रांतीय तरुण या व्यवसायात गुंतलेले दिसतात. काही परप्रांतीयांचा तर हा उद्योगच झालेला आहे. काही स्थानिक तरुणही या नशाखोरीच्या धंद्यात गुंतलेले दिसतात. दारू किंवा गांजाप्रमाणे या नशेचे कोणतेही 'चालचलन' दिसत नसल्याने नशिल्या गोळ्यांचा नशेखोर ओळखताच येत नाही. याच कारणामुळे अन्न-औषध प्रशासन आणि पोलिसही या बाबतीत काहीसे गाफील असलेले दिसतात. त्याचाच परिणाम म्हणून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला या नशिल्या गोळ्या गुंगी आणताना दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news