District Bank Election : जिल्हा बँक अर्जांची आज होणार छाननी | पुढारी

District Bank Election : जिल्हा बँक अर्जांची आज होणार छाननी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी (District Bank Election) मागील आठवडाभर नेत्यांसह इच्छुकांनी वाजत-गाजत उमेदवारी अर्ज भरले. या अर्जांची सोमवारी छाननी होणार आहे. 21 जागांसाठी 275 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी तब्बल 370 अर्ज दाखल झाले आहेत. यातील सुमारे 100 हून अधिक दुबार नावांसह अपात्र उमेदवारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 7 ते 21 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर पडद्यामागील घडामोडी वेगावणार आहेत. जिल्हा बँकेसाठी 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. आजी माजी-मंत्री, आमदार, खासदार, संचालकांसह तब्बल 275 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. (District Bank Election)

तालुकास्तरावर होणार्‍या सेवा संस्था गटातील निवडणुकीत ताकदवान नेताच तग धरणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे या 12 जागा वगळता इतर 9 जागांवर वर्णी लावून घेण्यासाठी मोठी चुरस आहे. मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी तब्बल 49 इच्छुक आहेत. बँक आणि पतसंस्था गटासाठी 44, महिला गटातील दोन जागांसाठी 42 तर दूध संस्था गटातून 39 अर्ज आले आहेत.

प्राप्त 370 अर्जांची सोमवारी दिवभर छाननी केली जाणार आहे. पात्र उमेदवारांची यादी 7 डिसेंबरला प्रसिद्ध केल्यानंतर माघार नाट्याला सुरुवात होईल. 21 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. यादरम्यान बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मोजक्या जागांसाठी निवडणूक लागेल, असे सध्याचे राजकीय चित्र आहे.

जिल्हा बँकेच्या निमित्ताने नेत्यांची खलबते (District Bank Election)

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निमित्ताने नेत्यांची खलबते सुरू झाली आहे. पडद्यामागील घडामोडी वेगावल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे ही नेतेमंडळी प्रामुख्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

दरम्यान, भाजप आघाडीचा समावेश आणि जागा वाटपाबाबत आ. पी. एन. पाटील आणि आ. विनय कोरे यांच्यात सोमवारी बैठक होणार आहे.

आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे आणि आ. प्रकाश आवाडे यांच्या शुक्रवारी (दि. 3) बैठक झाली होती. कोरे आणि आवाडे यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीतील चर्चा आणि कराव्या लागणार्‍या जोडण्याबाबत ना. हसन मुश्रीफ आणि आ. पी. एन. पाटील यांच्यात पुन्हा चर्चा झाली.

भाजप आघाडीला जागा, आ. प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीसह एका जागेची चर्चा, आ. कोरे यांचा काही जागांबाबत असलेला आक्षेप तसेच एकूण तीन जागांची मागणी आदींवर नेत्यांच्या बैठकीत सर्वसमावेशक चर्चा होऊन निर्णय होणार आहे.

दरम्यान, आ. पी. एन. पाटील आणि आ. विनय कोरे यांच्यासह महादेवराव महाडिक आणि आवाडे यांची पुन्हा एकत्रित बैठक होण्याची शक्यता आहे. सोमवारी अर्जांची छाननी होणार आहे. 7 डिसेंबरपासून अर्जांची माघार सुरू होईल. या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या या बैठकीकडे बँकेच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Back to top button