शाहूवाडी : जावयाकडून सासऱ्याची हत्या, मृतदेह ओढ्यात दगडांखाली लपवून ठेवला | पुढारी

शाहूवाडी : जावयाकडून सासऱ्याची हत्या, मृतदेह ओढ्यात दगडांखाली लपवून ठेवला

सरुड (ता. शाहूवाडी) : पुढारी वृत्तसेवा

शाहूवाडी (shahuwadi) तालुक्यातील निनाई परळे येथे किरकोळ कारणातून सासऱ्याची जावयाने हत्त्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. कडवी पाटबंधारे प्रकल्पाच्या परिसरातील ओढ्याच्या पत्रात दगडांखाली आरोपीने लपविलेला मृतदेह शाहूवाडी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधून काढला.

राजू निकम (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव असून याप्रकरणी पोलिसांनी निकम याचा जावई लहू निकम याच्या विरोधात रात्री उशिरा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटनेनंतर संशयित पसार झाला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही खुनाची घटना घडली असल्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

shahuwadi :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्थलांतरित कातकरी समाजातील लहू निकम (वय ४६) हा वेठबिगारी उचत (ता. शाहूवाडी) येथे एका धनिकाकडे जनावराच्या गोठ्यात कामाला होता. लहू निकम याने चोरी केल्याच्या संशयातून गोठा मालकाशी त्याचा वाद झाला होता. तर सासरा राजू निकम यानेच सदर चोरीच्या घटनेबाबत गोठा मालकाला सांगितल्याचा राग लहू याच्या मनात धुमसत होता.

अशावेळी निमित्त साधून लहू याने आपल्या सासू-सासऱ्यांना गोड बोलून निनाई परळे (ता. शाहूवाडी) येथील राहत्या झोपडीत बोलावून घेतले होते. बुधवारी रात्री या सर्वांनी एकत्र बसून मद्यपान केले. जावई लहू याने संधी मिळताच सासऱ्याशी भांडण उकरून काढले. नशेत असल्यामुळे इतरांना भांडणाचा नेमका अंदाज आला नाही, याचवेळी लहू याने केलेल्या बेदम मारहाणीत सासरा राजू निकम हा जागीच गतप्राण झाला. यावेळी लहूने हा मृतदेह घाईघाईने कडवी प्रकल्पाजवळ ओढ्याच्या पत्रात दगडांखाली लपवून ठेवला. ‘याबाबतची बाहेर कोणाकडेही वाच्यता केलीत तर याद राखा’, असा दम देऊन संशयित लहू हा पत्नी व कुटुंबासह घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी फोनवरून दिलेल्या माहितीनुसार शाहूवाडी पोलीसांनी स्थानिक पोलीस पाटील यांच्या मार्फत या घटनेबाबत सत्यतेची पडताळणी केली असता दोन दिवसांनी खुनाची घटना उघडकीस आली. सहायक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील, पोलिस अंमलदार श्रीकांत दाभोळकर, बाजीराव सिंघन, सुयश पाटील, तसेच स्थानिक पोलीस पाटील व ग्रामस्थांनी कडवी धरण परिसरात शोध मोहीम राबवून एका ओढयाच्या पत्रात दगडांखाली लपविण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी जागेवर घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयाकडे पाठवला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

आरोग्य विभागाची उदासीनता

मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची गैरसोय झाल्याने शाहूवाडी पोलिसांनी मृतदेह सीपीआर (कोल्हापूर) रुग्णालयात नेला. मात्र येथेही शवविच्छेदनाची जबाबदारी घेण्यास असमर्थता दर्शवित आरोग्य यंत्रणेने पोलिसांशी हुज्जत घातली होती. मलकापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणत्या शिफारशीनुसार इकडे मृतदेह पाठवून दिला ? असे निरुत्तर करणारे सवाल उपस्थित यंत्रणेने केल्यामुळे सडलेल्या अवस्थेतील मृतदेहासोबत रात्रभर ताटकळत बसून पोलिसांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची सकाळपर्यंत वाट पहावी लागली. अखेर वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याने पहाटे सहाच्या सुमारास उत्तरीय तपासणीचे सोपस्कार पार पडले.

shahuwadi : स्थलांतरित ‘उपेक्षित’ समाजाची फरपट

सिंधूदुर्ग जिल्हयातील कातकरी समाजातील काही कुंटुबे उदरनिर्वाहसाठी शाहुवाडी तालुक्यातील निनाई परळे, निळे परिसरातील माळावर अथवा शेतात झोपडी बांधून राहत आहेत. वेठबिगारी कामात गुंतलेल्या या समाजातील पुरुषांसह महिला महिला देखील व्यसनाच्या आहारी गेल्या आहेत. यामुळे या समाजातील बहुतांश लहान मुले शाळाबाह्य राहत आहेत. मोजकीच मुले आश्रम किंवा निराश्रित शाळेत शिक्षण घेताना दिसतात.

Back to top button