कोल्हापूर : दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच कोल्हापूर शहर आणि परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. दिवाळीची सुट्टी सुरू झाल्यापासून गेल्या सात दिवसांत 8 लाख 13 हजार 674 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. तर शहरातील रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, टाऊन हॉल म्युझियम, तसेच जोतिबा, पन्हाळा, गगनबावडा, कणेरी मठ, नृसिंहवाडी आणि खिद्रापूर यांसारख्या पर्यटन स्थळांवरही पर्यटकांनी मोठी गर्दी केली. दिवाळीचा उत्साह व सुट्टीचा योग साधत हजारो पर्यटकांनी कोल्हापूरला पसंती दिली.
दिवाळीच्या सुट्टीचा योग
20 ऑक्टोबरपासून दिवाळीला प्रारंभ झाला. तर 18 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू झाली होती. दिवाळीच्या सुट्टीच्या पहिल्या दिवसापासून कोल्हापुरात पर्यटकांचा ओघ वाढू लागला होता. शुक्रवार, दि. 24 रोजी दिवसभरात तीन लाख भाविक अंबाबाई चरणी लीन झाले.
पावसामुळे पर्यटकांची तारांबळ
शुक्रवारी दुपारी चारनंतर पावसाने अचानक जोर धरल्याने अनेक पर्यटकांची तारांबळ उडाली. सुरुवातीला रिमझिम सुरू झालेला पाऊस सायंकाळी वाढला. यामुळे मुख्य बाजारपेठांमधील खरेदीवरही परिणाम झाला. अनेकांनी छत्र्या आणि रेनकोटचा आसरा घेतला. तर काही पर्यटकांनी हॉटेल व मंदिर परिसरात आसरा घेतला. सायंकाळी सातनंतर पावसाचा जोर कमी झाला.
शालेय सुट्टीमुळे पर्यटनाला उधाण
दिवाळीच्या शालेय सुट्ट्या 2 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. यासोबतच चौथा शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी आल्याने सहकुटुंब पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह आसपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दीचे प्रमाण आणखी वाढले आहे. पुढील आठवड्यातही कोल्हापुरातील अनेक हॉटेल्स, लॉज, यात्री निवास यांचे बुकिंग झाले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पर्यटक वाहनांची गर्दी वाढल्याने महाद्वार रोड, शिवाजी रोड, स्टेशन रोड, महापालिका परिसर, राजारामपुरी, आणि शाहूपुरी परिसरात वाहतूक कोंडी झाली. मंदिर परिसराकडे जाणार्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.