अवकाळी पाऊस : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगडला फटका | पुढारी

अवकाळी पाऊस : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगडला फटका

कोल्हापूर : अवकाळी पाऊस : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे 5 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. साखर हंगामही चार-पाच दिवस लांबणार आहे. गुर्‍हाळघरेही बंद आहेत. जिल्ह्यात अवकाळीने सुमारे 120 कोटींवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी हिवाळ्यात अशा अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची कुठलीही नोंद नाही.

गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या तीन दिवसांत जिल्ह्यात सरासरी 57.74 मि.मी. पाऊस झाला आहे. डिसेंबर महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असावी, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात इतक्या पावसाची नोंद यापूर्वी कधीच झालेली नाही.

पावसाने जिल्ह्यात आंबा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या आलेला मोहोर खराब होण्याची शक्यता आहे. या पावसाने अनेक ठिकाणी मोहोर झडून गेला आहे. ज्या ठिकाणी मोहोर शिल्लक आहे, त्या ठिकाणी त्याची अपेक्षित वाढ होण्याची शक्यताही कमी आहे. यामुळे जिल्ह्यात आंबा उत्पादनात यंदा घट होणार आहे. पावसाने हवेतील आर्द्रता वाढल्याने पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावही वाढणार आहे.

शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील द्राक्षांचे मोठे नुकसान ( अवकाळी पाऊस ) 

जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील द्राक्ष बागांचेही पावसाने मोठे नुकसान केले आहे. सुमारे 25 एकरातील बागा पावसाने उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष बागायदारांचे दोन-तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात भाजीपाल्याच्या शेतीवरही काहीसा परिणाम झाला आहे. शेतात पाणी साचल्याने काढणीसाठी आलेला भाजीपाला शेतातच कुजून गेल्याने जिल्ह्यात भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसाने गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील बहुतांशी गुर्‍हाळघरे पूर्णपणे बंद आहेत. यामुळे गुर्‍हाळघरांचेही आतापर्यंत सुमारे 5 ते 6 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुर्‍हाळघरे आणखी काही दिवस बंद राहण्याचीही शक्यता आहे. यामुळे हे नुकसान आणखी वाढण्याचीही भीती आहे.

अवकाळीचा जिल्ह्यातील साखर उद्योगाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील साखर हंगाम आणखी पाच ते सहा दिवस पुढे गेला आहे. अवकाळीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी ऊस तोडण्या बंद झाल्या आहेत.

जिल्ह्यात झालेल्या पावसाने साखर उतारा आणि साखर उत्पादनावरही परिणाम जाणवणार आहे. कारखान्यांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यासह जिल्ह्यात वीट व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे सुरू झालेेले नाहीत.पंचनामे झाल्यानंतर जिल्ह्यात नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होईल.

पावसाने दोन दिवस झोडपून काढल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्याला याचा मोठा फटका बसला. दै. ‘पुढारी’ने या परिसरात पाहणी केली असता सुमारे 4 हजार 200 हेक्टरवरील भात पीक भुईसपाट झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. भात पिकांचे सुमारे 70 ते 80 कोटींचे नुकसान झाले आहे. हातकणंगले तालुक्यातही 15-20 हेक्टरवरील ज्वारीला फटका बसला आहे.

Back to top button