कोरोना काळात वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य योद्ध्यासारखे - पुढारी

कोरोना काळात वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य योद्ध्यासारखे

देवाळे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात सर्वजण घरामध्ये बंदिस्त होते. जगात चाललेल्या घडामोडी केवळ विश्वासार्ह पद्धतीने वृत्तपत्रेच देऊ शकत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी केलेले कार्य योद्ध्याप्रमाणेच आहे, असे प्रतिपादन हॉटेल तंदूर कॉर्नरचे मालक महेश चव्हाण (भैया) यांनी केले. करवीर तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व हॉटेल तंदूर कॉर्नरने स्वीकारले होते. अध्यक्षस्थानी वृत्तपत्र विक्रेते जयसिंग कांबळे होते. राजतारा फुड्सचे (दाजीबा आइस्क्रीम) संचालक राजेंद्र पाटील, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते महादेव परीट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी करवीर तालुक्यातील 70 हून अधिक वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

महेश चव्हाण म्हणाले, कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचवणार्‍या विक्रेत्यांचा सत्कार करण्याची संधी दै. ‘पुढारी’मुळे आम्हाला लाभली. दै. ‘पुढारी’च्या पुढाकारातून या वृत्तपत्र विक्रेत्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान केल्यामुळे त्यांच्या आयुष्यभरातील केलेल्या कामाची चीज झाली आहे. कोरोना, महापूर यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीही वृत्तपत्र विक्रेत्यांनी कर्तव्याचे महत्त्व जाणून ‘पुढारी’ घरोघरी पोहोचवला.

यावेळी हॉटेल तंदूर कॉर्नरचे मालक सागर चव्हाण म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांमुळेच कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये वाचकांना घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

राजतारा फुड्स (दाजीबा आइस्क्रीम) व हॉटेल आपुलकीचे संचालक राजेंद्र पाटील म्हणाले, मी शालेय जीवनात वृत्तपत्र विक्रेता होतो. वृत्तपत्राचे वाटप करीत होतो. यावेळी मला गावातील जगरहाटीची माहिती मिळाली. या व्यवसायातूनच मी माझ्या करिअरची सुरुवात केली. आपणही प्रामाणिकपणे व सचोटीने हा व्यवसाय पुढे न्यावा. या व्यवसायातील असणार्‍या अडचणींवर मात करीत आपल्याला यश संपादन करावे लागणार आहे. यावेळी अनिल घराळ, कृष्णात मेटिल, जयसिंग कांबळे, सुभाष काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.

उत्तम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जाहिरात प्रतिनिधी राजू तिवले यांनी स्वागत केले. सहायक वितरण व्यवस्थापक अमर पाटील यांनी प्रास्ताविक केले. सन्मानपत्राचे वाचन वितरण प्रतिनिधी श्रीकांत सावंत यांनी केले. सहायक वितरण व्यवस्थापक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

या सन्मान सोहळ्याला सहायक वितरण व्यवस्थापक उत्तम पालेकर, वितरण प्रतिनिधी शशांक पाटील, राजाराम कुलकर्णी, रवींद्र पाटील, किशोर मोरे, रघुनाथ दळवी, अक्षय पाटील, उमेश सूर्यवंशी, राहुल सडोलीकर, रवींद्र बागल उपस्थित होते.

दै. ‘पुढारी’च्या या उपक्रमामुळे आमच्यासारख्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे. कोरोना काळात केलेल्या कामाचे आज खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान आम्हाला होत आहे. हे सन्मानपत्र आम्हाला नेहमीच दिशादर्शक ठरेल.
– चंद्रकांत इळके, वृत्तपत्र विक्रेता, गोकुळ शिरगाव

कोरोनासारख्या महाभयंकर काळात आमचे कुटुंब फक्त वृत्तपत्र व्यवसायावरच अवलंबून होते. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेता असल्याचा आम्हाला अभिमान आहे. दै. ‘पुढारी’ने या सन्मानपत्राच्या माध्यमातून आम्हाला नवी ओळख निर्माण करून दिली आहे. हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.
– कृष्णात मेटिल, वृत्तपत्र विक्रेता, वाशी

एक वृत्तपत्र विक्रेता असल्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपले काम हे ज्ञानदान वाटप करण्याचे आहे. त्यामुळे सर्वच वृत्तपत्र विक्रेत्यांनी मी वृत्तपत्र विक्रेता असल्याचे ठामपणे सांगितले पाहिजे. दै. ‘पुढारी’ने हा उपक्रम राबवून आमच्यामधील आत्मसन्मान जागृत केला आहे.
– अनिल घराळ, वृत्तपत्र विक्रेता, सांगरूळ

Back to top button