साखर दरात घसरण; निर्यातदार बॅकफूटवर - पुढारी

साखर दरात घसरण; निर्यातदार बॅकफूटवर

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : जागतिक बाजारामध्ये साखरेचे दर उतरू लागल्याने भारतीय साखर उद्योगाने तूर्त साखर निर्यातीच्या आघाडीवर एक पाऊल मागे घेतले आहे. देशांतर्गत बाजारामध्ये साखरेचे भाव चांगले मिळू लागल्याने सध्या तरी साखर उद्योगाचे लक्ष भारतीय बाजारपेठेवर राहील, असे चित्र असून, जागतिक बाजारात साखरेची स्थिती कायम राहिली, तर आगामी काळात साखर निर्यातीसाठी अनुदानाची मदत घ्यावी लागणार आहे.

यंदा साखरेच्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर जागतिक बाजारात साखरेचे दर टिपेला पोहोचले होते. कच्च्या साखरेला प्रतिपाऊंड 21 सेंट (प्रतिक्विंटल सुमारे 3400 रुपये) भाव मिळाल्याने निर्यातीकडे उद्योगाचा कल होता. केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय साखर निर्यात होऊ शकते, असे यंदा प्रथमच घडले. या स्थितीला ब्राझीलमधील उत्पादनातील घट, थायलंडमधील दुष्काळ कारणीभूत ठरला. या संधीचा लाभ उठवत भारतीय साखर उद्योगाने पहिल्या दोन महिन्यांतच 35 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे करार केले. यात महाराष्ट्र व कर्नाटकातील साखरेच्या निर्यात कराराचे प्रमाण लक्षणीय आहे. तथापि, गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात साखरेचे भाव घसरले. सध्या कच्ची साखर 18 सेंट प्रतिपाऊंडपर्यंत (प्रतिक्विंटल 3100 रुपये) खाली आली. याउलट देशांतर्गत बाजारात साखरेला चांगला दर आहे. त्यामुळे सध्या तरी कारखान्यांचे लक्ष देशांतर्गत बाजारपेठेवर असेल.

नोव्हेंबरअखेर देशात 416 साखर कारखान्यांनी केलेल्या गाळपात 47.21 लाख मे. टन साखर उत्पादित झाल्याचे भारतीय साखर कारखाने संघाने (इस्मा) आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. गतवर्षी याच काळात हे उत्पादन 43.02 लाख मेट्रिक टन इतके होते. यंदाचे उत्पादन 4.19 लाख मेट्रिक टनांनी अधिक आहे.

पहिल्या निविदेला मोठा प्रतिसाद

साखर उत्पादनाबरोबर देशात यंदा इथेनॉल उत्पादनाचा आलेखही उंचावतो आहे. देशात 2021-22 (डिसेंबर ते नोव्हेंबर) या कालावधीत पेट्रोलमधील 10 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऑईल उत्पादक कंपन्यांनी 459 कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीची निविदा प्रसिद्ध केली होती. त्याला इथेनॉल उत्पादकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. उत्पादकांनी 414 कोटी लिटर्स इथेनॉल पुरवठ्याचे देकार दिले आहेत. यापैकी 317 कोटी लिटर्स इथेनॉल खरेदी करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, तर ऑईल कंपन्यांनी 142 कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीसाठी दुसरी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेची अंतिम मुदत शुक्रवारी संपली. पुढच्या आठवड्यात त्याचे चित्र स्पष्ट होईल.

Back to top button