Chandrakant Jadhav : फुटबॉलपटू-उद्योजक ते आमदार! - पुढारी

Chandrakant Jadhav : फुटबॉलपटू-उद्योजक ते आमदार!

कोल्हापूर; सागर यादव : Chandrakant Jadhav : फुटबॉलपटू ते उद्योजक आणि अवघ्या 15 दिवसांत आमदार असा थक्क करणारा प्रवास आमदार चंद्रकांत जाधव यांचा ठरला. ‘क्रीडाप्रेमी’ आमदार अशीच त्यांची ओळख होती. फुटबॉल खेळाच्या विकासासाठी त्यांनी एफसी कोल्हापूर सीटीची निर्मिती करण्याबरोबरच इतर तालीम संस्था-तरुण मंडळांच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना सातत्याने प्रोत्साहन आणि पाठबळ दिले.

उत्तम फुटबॉलपटू असणार्‍या आ. जाधव यांची ओळख कोल्हापुरातील फुटबॉल खेळाला पाठबळ देणारा लोकप्रतिनिधी म्हणूनही होती. या खेळाला प्रोत्साहन मिळावे आणि कोल्हापुरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव करता यावे, यासाठी ते सातत्याने सक्रिय असायचे.

पाटाकडील तालीम मंडळाचे खेळाडू ( Chandrakant Jadhav )

प्रायव्हेट हायस्कूलकडून फुटबॉल खेळण्यास त्यांनी सुरुवात केली. पाटाकडील तालीम मंडळाच्या (पीटीएम) फुटबॉल संघातून 1975 पासून ते 1983 पर्यंतचा काळ गाजविला होता. फॉरवर्डला स्ट्रायकर व राईट आऊट म्हणून ते खेळत होते. स्कोर (गोल) करणारा खेळाडू अशी त्यांची ख्याती होती.

एफ.सी. कोल्हापूरची स्थापना ( Chandrakant Jadhav )

नवोदित फुटबॉलपटू घडविण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापुरात एफ.सी. क्लबची स्थापना केली. या माध्यमातून लहान मुला-मुलींमधून स्टार फुटबॉलपटू घडविण्यात आले. यातून तयार झालेल्या मुलींच्या संघाने आयलिगपर्यंत मजल मारली. या क्लबच्या माध्यमातून शेकडो नवोदित फुटबॉलपटू घडले असून ते आज विविध संघांमधून खेळत आहेत. छत्रपती शाहू स्टेडियमवर अनेक नामवंत फुटबॉल स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा कायम पुढाकार असायचा.

प्रसिद्ध उद्योजक, लोकप्रिय नेतृत्व, अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि खिलाडूवृत्ती जोपासणारा खेळाडू असे बहुआयामी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजे आ. चंद्रकांत जाधव होते.
– मालोजीराजे छत्रपती,
अध्यक्ष, कोल्हापूर स्पोर्टस् असो.

अत्यंत निगर्वी, संयमी व शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व, त्याचबरोबर खिलाडूवृत्ती जोपासणारा खेळाडू म्हणून चंद्रकांत जाधव यांची ओळख होती.
– आनंदराव पाटील,
माजी अध्यक्ष, पाटाकडील तालीम मंडळ

नवोदित खेळाडू घडविण्याबरोबरच एक काळ गाजविणार्‍या जुन्या-ज्येष्ठ खेळाडूंना आपुलीने पाठबळ देणारा फुटबॉलप्रेमी म्हणजे चंद्रकांत जाधव होते.
– संभाजीराव पाटील-मांगोरे,
सदस्य, के.एस.ए.

फुटबॉलपटूंची नवी पिढी घडविण्यासाठी चंद्रकांत जाधव यांनी स्वत:च्या एफ.सी. कोल्हापूर क्लबसोबतच इतर सर्व क्लब, तालीम संस्था, तरुण मंडळांना सातत्याने पाठबळ दिले.
– शिवाजी पाटील,
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त

Back to top button