करवीर तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा आज दैनिक ‘पुढारी’च्या वतीने सन्मान - पुढारी

करवीर तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा आज दैनिक ‘पुढारी’च्या वतीने सन्मान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीत आपला जीव धोक्यात घालून समाजातील प्रत्येकापर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम अविरतपणे केलेल्या करवीर तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना दै. ‘पुढारी’च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून पुईखडीजवळील वाडीपीर येथील हॉटेल तंदूर कॉर्नरमध्ये शुक्रवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व हॉटेल तंदूर कॉर्नर समूहाने स्वीकारले असून महेश चव्हाण (भैया) व सागर चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला जाणार आहे.

कोरोना महामारीत अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू होते. जगातील सत्य बातमीचा वेध घेण्यासाठी वाचकांचे मन आसुसलेले होते. सर्वत्र आणीबाणीसारखा काळ चालू होता. अशा भयानक काळात दै. ‘पुढारी’तील बातमीचा वाचकांना आधार मिळत होता. या काळात आधारवड बनलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी कोरोनाशी दोन हात करून इमाने इतबारे सेवा केली. हे जोखमीचे कार्य करताना अनेकांना कोरोनाची झळ बसली; मात्र न डगमगता वृत्तपत्र विक्रेता ‘पुढारी’ घराघरांमध्ये पोहोचवून लॉकडाऊन झालेल्या जगाचा एक दुवा बनला होता.

वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्राचा महत्त्वाचा दुवा आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी या संकटांशी मुकाबला करीत ते वृत्तपत्र घरोघरी पोहोचविण्याची सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. स्वतःच्या जीवाची बाजी लावत वृत्तपत्रे घरोघरी पोहोच केल्यामुळेच वाचन संस्कृतीला बळ मिळाले आहे. समाजातील अशा दुर्लक्षित घटकाचा सन्मान दै. ‘पुढारी’ करीत आहे. करवीर तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान हॉटेल तंदूर कॉर्नरचे मालक महेश चव्हाण (भैया) व सागर चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र व पान-सुपारी देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास करवीर तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे.

चायनीजचा ढकलगाडा ते डिलक्स हॉटेलपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

शून्यातून विश्व निर्माण करण्याची सुरुवातच मुळात यांची 2004 मध्ये कोल्हापुरातील क्रशर चौकातील चायनीजच्या ढलकगाड्यातून झाली. अल्पावधीतच त्यांच्या रुचकर अशा चविष्ट पदार्थांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली. साहजिकच ग्राहकांचा ओढा वाढू लागला. त्यानंतर येथेच न थांबता चव्हाण बंधूंनी 2008 मध्ये क्रशर चौक येथील व्ही. आर. कॉर्नरमध्ये हॉटेल तंदूर कॉर्नर छोट्याशा गाळ्यात चालू केले. ग्राहकाचा वाढता प्रतिसाद पाहून त्यांनी 2016 मध्ये पुईखडीजवळील वाडी पीर येथे हॉटेल तंदूर कॉर्नरची अद्ययावत अशी दुसरी शाखा चालू केली. त्यामध्ये फॅमिली रेस्टॉरंट, लॉजिंग, गार्डन, कॉन्फरन्स हॉल यासारख्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या हॉटेलला पंचक्रोशीतून तमाम ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या हॉटेलमधील प्रत्येक पदार्थाची चव ग्राहकांच्या जीभेवर रेंगाळत राहिली. यानंतर त्यांनी तिसरी शाखा ताराबाई पार्क येथे चालू केली. त्याही ठिकाणी रेस्टॉरंट, गार्डन यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. एका ढकलगाडीपासून ते तीन डिलक्स हॉटेल निर्माण करून चव्हाण बंधूंनी समाजासमोर एक आदर्श घालून दिला. त्यांच्या या यशात त्यांच्या मातोश्री श्रीमती छाया चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. हॉटेल व्यवसाय सांभाळतच त्यांनी समाजकार्यही चालू ठेवले आहे. अनाथ मुलांना व कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांना मोफत जेवण, नंदवाळ दिंडी वारी मार्गातील स्वच्छता यासारखे अनेक सामाजिक कार्य ते करत आहेत.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लकी ड्रॉ

कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमास उपस्थित वृत्तपत्र विक्रेत्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्यांना कुरुकली (ता. करवीर) येथील राजतारा फुडस् (दाजीबा आईस्क्रीम) व हॉटेल आपुलकीचे संचालक राजेंद्र लहू पाटील यांच्या वतीने सायकल भेट देण्यात येणार आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात वृत्तपत्र विक्रेता म्हणून केली होती. आज ते राजतारा फुडस् दाजीबा आईस्क्रिम या नावाने शीतपेये व पदार्थ निर्मिती करत आहेत. अल्पावधीतच त्यांनी स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. त्यांच्या करिअरचा हा प्रवास वृत्तपत्र विक्रेते व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Back to top button