मोहन भागवत म्हणाले संघकार्य गतीने वाढवा | पुढारी

मोहन भागवत म्हणाले संघकार्य गतीने वाढवा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात संघ स्वयंसेवकांनी अविरत सेवाकार्य केले. यामध्ये काही स्वयंसेवकांना प्राणही गमवावा लागला. कोरोनानंतर संघकार्याची गती अधिक वाढावी, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केली.

कणेरी येथील सिद्धगिरी मठावर आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा गुरुवारी समारोप झाला. संघाचे आजवर ज्या ज्या क्षेत्रात काम झाले ते परिणामस्वरूप समाजासमोर येईल, असे उपक्रम राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीत संघटनात्मक बाबींबरोबरच सेवाकाम, ग्रामविकास, धर्मजागरण, गोसंवर्धन, पर्यावरण अशा विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनामुळे संघाचे प्रशिक्षण वर्ग होऊ शकले नव्हते. नजीकच्या काळात ते कसे घेता येतील यावरही चर्चा झाली. बैठकीचा समारोप भागवत यांच्या मार्गदर्शनाने झाला.

मोहन भागवत म्हणाले, कोरोना काळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक होता. संघ स्वयंसेवकांनी या काळात अतुलनीय काम केले. जे जे म्हणून करता येईल त्या सर्व गोष्टी देशभरात स्वयंसेवकांनी केल्या. यामध्ये काही स्वयंसेवकांना प्राणही गमवावे लागले. कोरोनानंतर संघकार्याची गती अधिक वाढली पाहिजे.

संघ स्थापनेला 2025 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आजपर्यंत संघाने ज्या ज्या क्षेत्रात काम केले हे सर्व काम परिणामस्वरूप समाजासमोर येईल, अशा पद्धतीने उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. त्याद़ृष्टीने प्रत्येक विभागाने आपला विचार करावा, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

या बैठकीला सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी, सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुणकुमार, सुरेश सोनी, रामदत्त उपस्थित होते. तीन दिवसांचा दौरा आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता भागवत पुण्याकडे रवाना झाले. अद़ृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, सिद्धगिरी परिवाराचे सदस्य आदी उपस्थित होते.

Back to top button