अवकाळी पाऊस : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ११ ठिकाणी अतिवृष्टी - पुढारी

अवकाळी पाऊस : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ११ ठिकाणी अतिवृष्टी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याला अवकाळी पावसाने ( अवकाळी पाऊस ) जोरदार तडाखा दिला. बुधवारी रात्रीपासून अव्याहतपणे कोसळणार्‍या जोरदार पावसाने गुरुवारी दुपारपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर शहरासह 11 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. पावसाने पंचगंगेच्या पातळीत चार फुटांनी वाढ झाली. दरम्यान, बहुतांशी ठिकाणच्या ऊस तोडण्या ठप्प झाल्या आहेत. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी रात्री 11 पासून अवकाळी पावसाचा ( अवकाळी पाऊस ) जोर वाढला. रात्रभर धुवाँधार पाऊस कोसळत होता. गुरुवारी सकाळपासूनही संततधार सुरूच होती. पावसाचा जोर इतका होता की, काही अंतरावरीलही दिसत नव्हते. शहरातील गटारींना नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. जागोजागी पाणी साचले होते. काही ठिकाणी घरांत, दुकानातही गटारी, नाल्याचे पाणी शिरले.

शहराच्या अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी होते. वाहतूक शाखा ते महावीर महाविद्यालय या मार्गावर जयंती नाल्याच्या पुलावर अर्धा फुटापेक्षा जास्त पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना अक्षरश: कसरत करावी लागत होती.

सीपीआर चौकातही अशीच परिस्थिती होती. ताराराणी चौक, कोषागार कार्यालय, दाभोळकर कॉर्नर, परिख पूल, जिल्हाधिकारी कार्यालय, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आदी परिसरातही रस्त्यावर पाणी साचले होते. जोरदार पावसाने जयंती नाला दुथडी भरून वाहत होता. गांधी मैदान, दुधाळी मैदानाला तर तळ्याचे स्वरूप आले होते.

जनजीवनावर परिणाम ( अवकाळी पाऊस )

मुसळधार पावसाने जनजीवनावर मोठा परिणाम झाला. सकाळपासूच पाऊस सुरू असल्याने रेनकोट, छत्र्यांसहच घराबाहेर पडावे लागत होते. पावसाने शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी तर काही रस्ते ओस असे चित्र होते. बाजारपेठा, भाजी मंडई आदी ठिकाणी तुलनेने कमी गर्दी होती. जोरदार पावसामुळे अनेकांनी घराबाहेर पडण्याचेही टाळले.

पंचगंगेच्या पातळीत चार फुटांनी वाढ ( अवकाळी पाऊस )

पंचगंगेच्या नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. बुधवारी सांयकाळी साडेअकरा फुटांवर असलेली पंचगंगा दुपारी बारा वाजता साडे पंधरा फुटावर गेली. राजाराम बंधार्‍याच्या कठड्याला घासून पाणी वाहत होते. कसबा बावड्याच्या दिशेने पाण्याचे लोट रस्त्यावर आले होते. पाणी पातळी वाढल्यास बंधारा पाण्याखाली जाण्याची भीती होती. यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने बंधार्‍यावरील काही बरगे काढले. यामुळे पाणी पातळी सायंकाळपर्यंत स्थिर राहिली.

इचलकरंजीतही धुवाँधार; जिल्ह्यात दुपारनंतर उघडीप

कोल्हापूर शहरासह इचलकरंजी शहरातही धुवाँधार पाऊस झाला. दुपारी साडेबारापर्यंत पावसाचा जोर होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. काही काळ कडकडीत ऊनही पडले. त्यानंतर पुन्हा ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिला. दुपारी तीननंतर मात्र पावसाने उघडीप दिली. शहराच्या तापमानातही घट झाली. दैनदिन तापमानापेक्षा गुरुवारी 5 अंशांनी पारा घसरला. कमाल 25.2 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. किमान तापमान 20.4 अंशावर राहिले.

जिल्ह्यात सरासरी 49.7 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 49.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 63.3 मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडीत 57.8 मि.मी., करवीर तालुक्यात 54.7 मि.मी., कागलमध्ये 53.7 मि.मी., गगनबावड्यात 49.8 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 47.1 मि.मी., पन्हाळ्यात 46.6 मि.मी., भुदरगडमध्ये 42.7 मि.मी., चंदगडमध्ये 40 मि.मी., आजर्‍यात 39.8 मि.मी. तर शिरोळमध्ये 34.1 मि.मी. पावसाची नोंद झाली.

ऊसतोडी थांबल्या; शेतीचेही नुकसान

जिल्ह्यात पावसाने ऊस तोडणीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले. त्यामुळे ऊसतोडी थांबवाव्या लागल्या. काही ठिकाणी ट्रॅक्टर, ट्रक शेतातच अडकून पडले आहेत. पावसाने गृर्‍हाळघरे तर बंदच आहेत. वीटभट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊसतोडणी मजुरांच्या पालांतही पाणी शिरल्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी जोरदार पावसाने ही पालंही कोसळली आहेत. यामुळे ऊसतोडणी मजुरांवर भर पावसात आसरा शोधण्याची वेळ आली होती. पावसाने शेतींचेही नुकसान झाले. भाजीपाल्यावर पावसाचा चांगलाच परिणाम झाला. काही ठिकाणी कोबी, फ्लॉवरसह फूल शेती तसेच द्राक्षबागाही पावसाने उद्ध्वस्त केल्या. काही ठिकाणी शेतातील उभ्या शाळू, नाचणीसह इतर पिकांनाही पावसाचा तडाखा बसला. या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

आजपासून पावसाचा जोर कमी होणार

शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज आहे. जिल्ह्याच्या काही भागात एक-दोन वेळा पाऊस होईल. शनिवारपासून दोन दिवस वातावरण काही काळ ढगाळ होईल. पण पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Back to top button