डॉक्टर बाबासाहेब आंंबेडकर यांच्या साहित्याबाबत राज्य सरकार उदासीन | पुढारी

डॉक्टर बाबासाहेब आंंबेडकर यांच्या साहित्याबाबत राज्य सरकार उदासीन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : डॉक्टर बाबासाहेब आंंबेडकर यांच्या साहित्यासह अन्य साहित्यांच्या छपाईसाठी आणलेला सुमारे पाच कोटीचा कागद धुळखात पडल्याच्या वृत्ताची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. बाबासाहेबांच्या साहित्याच्या बाबतीत राज्यात उदासीन परिस्थिती ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने याप्रकरणी खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी हा विषय व्यापक जनहिताचा होत असल्याने उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने सुमोटो याचिका तयार करून मुख्य न्यायमूर्तींसमोर सादर करावी असे निर्देश दिले

राज्य सरकारच्यावतीने प्रकाशित करण्यात येणार्‍या डॉक्टर बाबासाहेब आंंबेडकर यांच्या साहित्यासाठी सुमारे पाच कोटी 45 लाखांचा कागद खरेदी करण्यात आला. बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषणाच्या नऊ लाख प्रती छापण्याचा आदेशही काढण्यात आला.परंतु गेल्या चार वर्षात केवळ 33 ग्रंथांची छपाई करण्यात आली आणि सुमारे 5 कोटींचा कागद गोडावूनमध्ये धूळखात पडून असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाले. या वृत्ताची न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी दखल घेतली.

काय म्हणाले हायकोर्ट ?

अशा प्रकारे छपाईसाठी आणलेल्या कागदाचा वापर न करता तो गोडावूनमध्ये पडून राहणे ही गंभीर बाब आहे. डॉ. बाबासाहेबांच्या साहित्या बाबत राज्य सरकारची त्यात उदासीन वृत्ती दिसून येते.डॉ.बाबासाहेबांचे साहित्य हा व्यापक जनहिताचा विषयआहे हे सर्व सामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे. ती काळाची गरज आहे. उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने याची दखल घेऊन सुमोटो याचिका तयार करून मुख्य न्यायमूर्तींसमोर सादर करावी असे निर्देश खंडपीठाने दिले.

Back to top button