Kalamba Jail : कळंबा जेलच्या भिंतींना भ्रष्टाचाराचे ‘भगदाड’!

Kalamba Jail : कळंबा जेलच्या भिंतींना भ्रष्टाचाराचे ‘भगदाड’!
Published on
Updated on

कोल्हापूर : आर्थर रोड, येरवड्यानंतर कळंबा जेलचा गुन्हेगारी वतुर्ळावर कधी काळी प्रचंड दबदबा होता… 'कळंबा' म्हटले की नामचिन गँगस्टर्ससह समाजकंटकांचीही बोबडी वळायची. 'कळंबा जेल, नको रे बाबा' असे गुन्हेगार म्हणत असलेल्या याच कळंबा जेलची 'भीक नको, पण कुत्रे आवर' अशी अवस्था झाली आहे. अलीकडच्या काळात जेलमधील घटना थरकाप उडवणार्‍या असतानाच पुन्हा नव्याने 50 मोबाईलसह संशयास्पद वस्तूंचा मोठा साठा सापडला. जेल व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि वरिष्ठांच्या भोंगळ कारभारामुळे कळंबा जेलच्या भिंतींना भ्रष्टाचाराने भगदाड पडल्याचे चित्र आहे.

कडेकोट तटबंदी आणि भक्कम सुरक्षा यंत्रणेचा दावा करणार्‍या मध्यवर्ती कळंबा कारागृहात खेळखंडोबा सुरू आहे. अमली पदार्थ तस्करांचा सुळसुळाट आहे. मोबाईलसह सिमकार्डचा चार भिंतींच्या कोठडीत खुलेआम वापर सुरू आहे. गांजाची उलाढाल थक्क करणारी आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांसह सुरक्षारक्षकांवरील जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार नित्याचे बनले आहेत. ढिसाळ व्यवस्थापनामुळे सात-आठ महिन्यांत घडलेल्या घटनांमुळे कळंबा जेलची सुरक्षा 'रामभरोसे' ठरली आहे.

म्हणे भक्कम सुरक्षा… जेल यंत्रणेचा नुसताच कांगावा!

जेलमधील कैद्यांकडे आढळणार्‍या गांजा, मोबाईलसह संशयास्पद साहित्यामुळे व्यवस्थापन यंत्रणा प्रभावीपणे सतर्क करण्यात आल्याचा दावा यंत्रणेकडून केला जात असला तरी त्यात फोलपणा जादा आहे. सद्यःस्थितीतही कैद्यांकडून मोबाईलसह संशयास्पद वस्तूंचा उघड-उघड वापर केला जात असल्याची चर्चा होती; मात्र वरिष्ठांना त्याची फिकीर नव्हती.

निलंबित सुभेदाराच्या सहभागाचा पोलिसांना संशय!

निलंबित सुभेदार गेंड याच्या घराच्या झडतीत पोलिसांनी 50 मोबाईलचे कव्हर हस्तगत केले होते. त्यामुळे नुकत्याच सापडलेल्या मोबाईल प्रकरणात गेंड याचा सहभाग असावा. याचा उलगडा लवकरच होईल, असे राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितल्याने याप्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कळंबा जेलच्या कारभाराची लक्तरे वेशीवर !

कैद्यांना गांजा, मोबाईलसह अन्य साहित्य पुरवठा करण्यात यापूर्वी काही झारीतील शुक्राचार्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. संबंधितांवर वेळोवेळी कारवाई होऊनही या वस्तू जेलमध्ये जातात कशा, हा कळीचा मुद्दा आहे. सुभेदार प्रकरणानंतर आठवड्याच्या शोधमोहिमेत एक-दोन नव्हे, तब्बल 50 मोबाईल आढळून आल्याचे कळंबा जेलच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

राज्यातील अन्य कारागृहांपेक्षा कळंबा जेल दोन-अडीच वर्षांपासून वादग्रस्त ठरले आहे. चार भिंतींआड कोठडीतील कैद्यांकडे गांजा, मोबाईलसह अन्य वस्तूंचा थेट पुरवठा केला जातो. वर्षापूर्वी कारागृहाचा तत्कालीन सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड यालाच जेलच्या सुरक्षारक्षकांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या पायातील सॉक्समधून 171 ग्रॅम, तर घरातून 2 किलो 300 ग्रॅम गांजा तसेच 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. ऑन ड्युटी गांजा जेलमध्ये नेताना सुभेदार जेरबंद झाला. राज्यात या घटनेची नाचक्की झाली, तरीही त्याचे कारागृह प्रशासनाला गांभीर्य राहिले नव्हते.

शोधमोहिमेत बनवेगिरीचा भांडाफोड!

पोलिस अधीक्षकाविना साडेपाच वर्षांपासून कळंबा जेलचा कारभार सुरू होता. माध्यमांनीही टीकेची झोड उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले; मात्र 'हम करेसो' अशीच वरिष्ठांची नीती राहिल्याने एकेकाळी अव्वल दर्जा असलेल्या कळंबा जेलला अवकळा आली होती. अधिकारी शामकांत शेडगे यांनी कळंबा जेल अधीक्षकपदाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. शेडगे यांनी पंधरवड्यात सुरू केलेल्या शोधमोहिमेत 50 पेक्षा जादा मोबाईलसह अन्य संशयास्पद साहित्य आढळून आल्याने जेल अंतगत सुरक्षा यंत्रणांच्या बनवेगिरीचा भांडाफोड झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news