school open : शाळा आजपासून सुरू : जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी; जबाबदारी शाळांवर | पुढारी

school open : शाळा आजपासून सुरू : जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी; जबाबदारी शाळांवर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : school open : दीड वर्षाच्या कालावधीनंतर शहरातील पहिली ते सातवी, तर ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्ग बुधवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळा परिसरात विद्यार्थ्यांचा किलबिलाट परत एकदा ऐकायला मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेण्यात आली असून, याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली आहे. शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाने मंगळवारी त्यासाठी शाळेच्या सॅनिटायझेशनसह जय्यत तयारी केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने पहिलीपासून सर्व वर्गांची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व महापालिका प्राथमिक शिक्षण समितीने शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा सुरू करण्याबाबतची नियमावली पाठविली आहे. जिल्ह्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या 1,421 शाळा आहेत. सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांचे 2 लाख 80 हजार 873 विद्यार्थी आहेत. पटसंख्या जास्त असलेल्या शाळांत 50 टक्के व कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थितीत शाळा भरणार आहेत.

school open : आरोग्य व शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी

करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले. शहरातील 1 ली ते 7 वीपर्यंतच्या सर्व माध्यम आणि व्यवस्थापनाच्या 209 शाळा असून, 60 हजार 347 विद्यार्थी संख्या आहे. दरम्यान, शहरातील शाळांमधील मुख्याध्यापकांची मंगळवारी व्हीसीद्वारे बैठक झाली. यात प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

  • पहिली ते चौथी (ग्रामीण) : शाळा – 1 हजार 421,
  • विद्यार्थी – 2 लाख 80 हजार
  • पहिली ते सातवी (शहर) : शाळा – 209,
  • विद्यार्थी – 60 हजार 347

school open : पुणे, मुंबई, ठाण्यातील शाळा लांबणीवर

राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत शाळा एक डिसेंबरपासून (बुधवार) सुरू होणार असल्या, तरी पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, मराठवाडा येथील महापालिका व खासगी शाळांची घंटा 15 डिसेंबर किंवा त्यानंतर वाजणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त व पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मंगळवारी पार पडलेल्या संयुक्त बैठकीत 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई व ठाणे महापालिकेनेही असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथील शाळाही 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

कोरोना आटोक्यात असल्यामुळे राज्य सरकारने राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईत आजही दररोज 200 पर्यंत कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेतील ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटचे सावट असल्यामुळे पालकांनी काही दिवस ऑनलाईन वर्ग सुरू ठेवावेत, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे शिक्षणाधिकार्‍यांनी आयुक्तांकडे शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता.

school open : नवी मुंबईत दिवसाआड शाळा

नवी मुंबई महापालिकेनेही 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत बोलावले जाणार आहे. शाळा दोन सत्रांत चालविल्या जाणार आहेत. एका वर्गात केवळ 25 विद्यार्थ्यांनाच बसता येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेनेही 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पुण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतर

पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी शाळा तूर्तास बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय परिस्थिती पाहून 15 डिसेंबरनंतर घेण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी महापालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांची याबाबत बैठक झाली.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा उघडण्यासंदर्भात घाई केली जाणार नाही. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास व शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या संमत्तीपत्रानंतरच शाळा उघडण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. शहरातील शाळाही 10 डिसेंबरनंतरच उघडल्या जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव ग्रामीण आणि महापालिका क्षेत्रातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

मराठवाडा

नांदेड जिल्ह्यातील शाळा एक डिसेंबरऐवजी 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे.

परभणीत शहरी भागातील 5 वी ते 7 वी वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, पहिली ते चौथीबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. औरंगाबाद महापालिका हद्दीत शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 तारखेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. ग्रामीण भागात मात्र पहिली ते चौथीच्या वर्गांची घंटा घणघणणार आहे.

विदर्भ

नागपूर शहरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात 10 डिसेंबरनंतरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले. तथापि, ग्रामीण भागातील शाळा मात्र उद्यापासून सुरू होणार आहेत. बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, अकोला, आणि भंडारा येथील शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शाळाही उद्यापासून सुरू होणार आहेत.

Back to top button