टोप येथे बेकायदेशीर घोडागाडी शर्यत; आठ जणांवर कारवाई | पुढारी

टोप येथे बेकायदेशीर घोडागाडी शर्यत; आठ जणांवर कारवाई

शिये (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : टोप (ता. हातकणंगले) येथील माळावर पेठ वडगाव येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून बेकायदेशीररित्या भरवण्यात आलेल्या घोडागाडी शर्यतीवर शिरोली पोलिसांनी धडक कारवाई करत तीन घोडागाडीसह आठ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेश खांडवे यांनी केली.

पेठवडगाव (ता हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्त्ये सचिन राजू कांबळे ( रा. दुर्गामाता मंदिर शेजारी ) यांच्या वाढदिवसानिमित्त टोप येथील माळभागात मंगळवारी सकाळी घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आसल्याची खबर शिरोली पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी धडक कारवाई करत आठ जणांना घोडागाडीसह ताब्यात घेतले. यामध्ये बर्थ डे बाय सचिन कांबळे, इब्राहिम बालेचँद खतीब ( वय ३८ रा. हेर्ले ता. हातकणंगले ), हरिश्चंद्र भगवान बंडगर ( वय 33 रा. शामराव नगर सांगली ), किरण रघुनाथ लोंढे ( वय 20 रा. पोखणी ता. वाळवा, जि. सांगली) अनिकेत बाळासो चौगुले (रा. धामोड ता. राधानगरी ) सलीम बाळासो बारगिर ( वय 31 रा. मौजे वडगाव ता. हातकणंगले), प्रमोद आप्पासो राजपूत ( वय 27 रा. कुपवाड ता. मिरज जि. सांगली) सचिन मनोहर चौगुले (वय 38 रा नागाव , ता .वाळवा, जि. सांगली) अशी ताब्यात घेण्याची नावे आहेत.

कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूंचे संसर्गात वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी यांनी जमाबंदी व इतर आदेश काढले आहेत. असे असताना त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत यातील आठ जणांनी घोडा गाडी शर्यतीचे बेकायदेशीर आयोजन केले होते. तर या शर्यतीत घोड्यांना निर्दयतेने वागणूक देऊन मारहाण केली आहे. त्यामुळे घोडा गाडी शर्यत आयोजक घोडा मालक, घोडे वाहतूक करणारे वाहन मालक यांच्या विरोधात शिरोली पोलिसाने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे करीत आहेत

Back to top button