
कौलव : जागतिकीकरणामुळे खेड्यापाड्यांचे चित्र बदलत असताना अनेक पारंपारिक रूढी परंपरा आजही मोठ्या भक्ती-भावाने जोपासल्या जात आहेत. गुढीपाडव्या दिवशी ग्रामदैवताच्या देवळात अथवा पारावर आगामी वर्षाचा अंदाज वर्तवणाऱ्या पंचांगाचे पाडवावाचन आजही केले जाते. यंदा पाऊस परटाच्या घरातून निघणार असून चार पायली पडणार आहे. तर विविध कायद्यात बदल होईल व मोठा संघर्ष माजेल, असा अंदाज वर्तवला आहे. यंदाही रोहिणीचा पेरा साधून शेतकऱ्यांना मोत्याचा तुरा भेटणार आहे, असाही अंदाज यावेळी वर्तवण्यात आला. कौलव येथे आज (दि.९) रघुनाथ गुळवणी यांनी पाडवा वाचन केले.
गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी नवीन वर्षाच्या पंचांगाचे गावोगावी पूजन केले जाते. बहुतांशी गावात ग्रामदैवतांच्या देवळात पंचांगाचे पूजन करून देवळासमोरील पारावर ग्रामस्थांना बसवून पाडवा वाचन करण्याची प्रथा आजही जोपासली जात आहे. गावातील पाटील व अन्य मानकरी तसेच बारा बलुतेदार देवळात येऊन पंचांगाची व ग्रामदैवताची पूजा करतात त्यांनतर पंचांगाचे वाचन केले जाते. व कडूनिंबाचे वाटप करून प्रसाद दिला जातो. या पाडवा वाचनातून आगामी वर्षातील पाऊसमान पीकमान, रोगराई व नैसर्गिक आपत्ती तसेच राजकीय घडामोडी यांचा अंदाज तंतोतंत वर्तवला जातो. यालाच पाडवा वाचन असे म्हणतात. आज ग्रामीण भागातील बहुसंख्य गावात पाडवा वाचन संपन्न झाले.
यंदाच्या पाडवा वाचनातून रोहिणीचा पेरा साधणार असून पाऊसमान चांगले असल्यामुळे मोत्याचा तुरा पिकेल, असा अंदाज वर्तवला आहे. यंदा पाऊस परटाच्या घरातून निघणार असून एकूण चार पायली पडणार आहे. त्यापैकी जमीनीवर एक पूर्णांक दोन पंचमांश कोळवी, समुद्रावर दोन पायली, पर्वतावर एक पायली सहा पुर्णाक तीन पंचमांश एवढा पाऊस पडणार आहे. देशात बहुसंख्य ठिकाणी दमदार पाऊसाने धान्य मुबलक पिकणार आहे. तर पंजाब संयुक्त प्रांत काठेवाड भागात पावसामुळे नुकसान होणार आहे. तर काही ठिकाणी कमी पावसामुळे पिकांची हानी होणार आहे . यंदा पांढरी पिके चांगली पिकणार असून पीकमान ६५ टक्के एवढे राहणार आहे. चांगले पिकणार आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी तसेच वादळी-वाऱ्यामुळे नुकसान होणार आहे. पाणीसाठा जपून वापरावा लागणार असून नद्या जोड- प्रकल्प राबवणे गरजेचे बनणार आहे. राजकीय आघाडीवर संघर्षाचे व गोंधळाचे वातावरण निर्माण होणार आहे. देशात अनेक कायदे बदलले जाणारा असून त्यामुळे प्रजापक्ष व विरोधी पक्षा दरम्यान टोकाचा संघर्ष निर्माण होणार आहे. अनेक धार्मिक गोष्टीत गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे, असे अनेक अंदाज यावेळी वर्तवण्यात आले.
शासन जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय अमलात आणेल, असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे .आजच्या ग्लोबल युगातही ग्रामीण जीवन सांस्कृतिक अनेक बदल होत असताना पाडवा वाचनाची परंपरा मोठ्या श्रद्धेने जोपासली जात आहे. पाडवा वाचनाचे अंदाज तंतोतंत खरे ठरतात, अशी श्रद्धा असून बहुतांशी शेतकरी शेती कामाचे नियोजन पाडवा वाचनानुसारच करत असतात हे वैशिष्ट्य आहे.
हेही वाचा :